सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनाला जनता फसल्याची टीका सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारा निमित्त निगडी प्राधिकरण इथं उदयनराजे भोसले यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. तरुणांना रोजगार देऊ, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करू अशा अनेक घोषणा मोदींनी केल्या होत्या. त्यावर विश्वास ठेवून लोकांनी प्रचंड बहुमतांनी त्यांना सत्ता दिली. मात्र यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. लोकांनी विश्वास ठेवला ही त्यांची चूक झाली. भाजप-शिवसेना सरकारने केसांनी लोकांचा गळा कापला असल्याचा घणाघाती टिका उदयनराजे यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सभेच्या सुरुवातीलाच साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बहुचर्चित असलेली ही सभा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र शब्दाला पक्के असणारे उदयनराजे नऊ वाजण्याच्या सुमारास सभेच्या ठिकाणी हजर झाले. यावेळी पाऊस होऊनही उदयनराजे यांचे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौपेर टीका केली.


पाच वर्षात नरेंद्र मोदी यांनी फक्त 'मन की बात' केली. एवढा मोठा अभिनय मी कधीच बघितला नव्हता. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, अशी खोटी आश्वासने देऊन जनतेची त्यांनी फसवणूक केली. लोकांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेऊन प्रचंड बहुमत दिले. मात्र सत्तेत विराजमान झाल्यानंतर त्यांनी जनतेकडेच पाठ फिरवली. 'तो मी नव्हेच' अशी भूमिका त्यांनी घेतली. जनता हाच लोकशाहीतला राज आहे. 


पाच वर्षात या सरकारने देशाची काय अवस्था केली आहे. अनेक जवान शहीद झाले. मग लोकशाहीतले राजे आज गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले की, यांना फक्त तुमची मते हवी आहेत. तुमची किंमत त्यांना कळत नाही. शिवरायांना जशी जनतेची किंमत होती, तसेच तुमची किंमत देखील आम्हाला आहे. आता यांची भरसभेत भांडणे सुरू आहेत. काय यांच्याकडून अपेक्षा करायची. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत अशी बोचरी टीका राजेंनी केली...! मी म्हणजेच पार्थ पवार असं समजून मतदान करा असे आवाहनही उदयनराजे यांनी केले.