रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू आणि स्वाभिमानी पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज येत आहेत. सांगली लोकसभेसाठी, वसंतदादांच्या घरातील व्यक्तीच्या प्रचाराला अनेक वर्षांनंतर शरद पवार हे सांगली जिल्ह्यात येत आहेत. तासगाव येथे पवार यांची प्रचार सभा आहे. भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या तासगाव मध्येच ही संयुक्त पुरोगामी आघाडीची प्रचार सभा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच सख्य राज्याने आणि देशाने पाहिले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेऊन शरद पवार यांनी मुख्यमंत्री पद मिळवले होते. तेव्हा पासून शरद पवार यांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका व्होवून लागली. राज्यात अजून ही या दोन नेत्यांचे गट बघायला मिळतात. सांगली जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष प्रामुख्याने या गट तटाच्या आधारावरच सत्ता संघर्ष करत आहेत. मात्र यंदाची निवडणूक सर्वच पक्षासाठी महत्वाची आहे, त्यामुळे आघाडी आणि युती या मित्रत्वाचा धर्म पाळताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवर हे तंतोतंत खर नसलं तरी, वरिष्ठ नेते मात्र आघाडी धर्म पळत आहेत.


मात्र यंदाच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्या साठी अनेक नवीन राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. इथं पहिल्यांदाच काँग्रेसच्या हात या चिन्हावरचा उमेदवार निवडणूकीत नाही. तर प्रथमच इथे घराणेशाही आणि विकासाच्या मुद्द्यांऐवजी, जातीय समीकरणाच्या आधारावर प्रचार होताना दिसत आहे. प्रथमच काँग्रेस मधील सर्व गट एकत्र आणि राष्ट्रवादीचे नेते प्रचारात एकदिलाने सहभागी झाल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. आणि ज्या वसंतदादांच्या घराण्यातील जवळपास सर्वांनीच आजपर्यंत शरद पवार, जयंत पाटील आणि पर्यायाने राष्ट्रवादीवर टीका केली. त्याच घराण्यातील वारसदारांच्या प्रचाराला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज अनेक वर्षांनंतर येत आहेत. ही घटना जुन्या पिढीतील लोकांच्या पचनी पडत नाही. मात्र 'राजकारणात कुछ भी हो सकता है', असेच म्हणण्याची वेळ सांगलीकरांवर आली आहे.


यापूर्वी 1998 च्या निवडणुकीत वसंतदादा पाटील यांचे पुतणे मदन पाटील यांच्या प्रचासाठी शरद पवार सांगलीला आले होते. वसंतदादाचे पुत्र आणि तत्कालीन खासदार स्वर्गीय प्रकाशबापू पाटील यांना 1996 आणि 1998 ला काँग्रेसने उमेदवारी दिली नव्हती. त्यांच्या ऐवजी वसंतदादा पाटील यांचे पुतणे मदन विश्वनाथ पाटील याना उमेदवारी मिळाली होती. आणि मदन पाटील त्या दोन्ही वेळी विजयी सुद्धा झाले होते. मात्र राष्ट्रवादीच्या स्थापने नन्तर 1999 ला काँग्रेसकडून प्रकाश बापू पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे मदन पाटील अशी निवडणुक झाली, त्यात काँग्रेसचे प्रकाश बापू विजयी झाले होते.शरद पवार 1998 मध्ये तत्कालीन उमेदवार मदन पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीत आले होते. 1998 नंतर पहिल्यांदाच सांगली लोकसभेसाठी, वसंतदादांच्या घरातील व्यक्तीच्या प्रचाराला पवार आज येत आहेत. त्यामुळे तसे पाहिले तर दादांच्या नातवाच्या प्रचारासाठी शरद पवार यांची पहिलीच सभा म्हणावी लागेल.