उस्मानाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उस्मानाबादमध्ये आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींची नक्कलही केली. तसंच 'मी राहुल गांधींना जाहीर आव्हान देतो. सावरकरांची कोठडी बघा. एक दिवस फटके खा, मग हातात पेन घेऊन लिहून दाखवा. नेहरुंनी कोणत्या तुरुंगात हालअपेष्टा सोसल्या? मी नेहरुंना कमी लेखत नाही, पण सावकर यांच्यावर टीका का?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माढ्यातून तुमचा सेनापती पळाला आहे, त्यामुळे तुम्ही उगाच दाणपट्टे फिरवू नका', असं उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना म्हणाले. तसंच 'ऑनलाईन लॉटरी प्रकरण काय आहे? तुमचे गृहमंत्रीपद काढून ते आर.आर.पाटील यांच्याकडे का द्यावं लागलं?', असा सवालही उद्धव ठाकरेंनी जयंत पाटील यांना विचारला.


या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. 'देशद्रोहाचं कलम काढणार असल्याचं काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे का?' असं उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना विचारलं.


'परदेशी असण्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सोनिया गांधींनी तुम्हाला पक्षातून काढलं. पण नंतर त्यांच्याशीच पवारांनी आघाडी केली. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यावर हाताला लकवा मारतो, असं पवार म्हणाले होते. पण तरीही माझ्यावर भाजपशी युती केल्यावर टीका करतात', असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. 


पाहा उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण