खासदार चंद्रकांत खैरेंना आगामी निवडणूक अडचणीची जाणार?
खासदार चंद्रकांत खैरेंसाठी आगामी निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
विशाल करोळे, औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांना आगामी निवडणूक अडचणीची झाली आहे. चंद्रकांत खैरे यांनी चार वेळा मोठ्या फरकाने प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत औरंगाबादचे खासदार झाले. मात्र यंदाची निवडणूक खैरेंना सोपी राहणार नाही. कारण शिवसेनेत खैरेंना छुपा विरोध वाढला आहे. खैरेंच्या हुकूमशाहीला सर्वसामान्य शिवसैनिक वैतागल्याची चर्चा आहे. त्यातच खैरेंविरोधात त्यांच्याच बालेकिल्ल्यातच म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी केली आहे. खैरेंचा पराभव करत जिंकणारच अशी प्रतिज्ञा करत जाधवांनी पक्षाला रामराम केला आहे.
चंद्रकात खैरैंचा मतदारसंघ औरंगाबाद शहर आणि ग्रामीण असा पसरला आहे. त्यात युती झाली असली तरी भाजपाचे नेतेही खैरैंवर नाराजच आहे. याचाही फटका त्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. औरंगाबाद पूर्व मतदारसंघ - या ठिकाणी भाजपाचे अतुल सावे आमदार आहेत. युती नसताना एमआयएमच्या उमेदवारापेक्षा फक्त हजार मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. शिवसेना इथं तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या मतदारसंघात खैरेंना धोका आहे.
औरंगाबाद मध्य - या ठिकाणी एमआयएमचे इम्तियाज जलील आमदार आहेत. सोबतच शिवसेना-भाजपा वाद या मतदारसंघात मोठा आहे. त्यामुळे इथे खैरेंना फटका बसण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद पश्चिम - शिवसेनेचे संजय शिरसाठ या ठिकाणी आमदार आहेत. खैरै आणि संजय शिरसाठ यांच्यात टोकाचे मतभेद झालेत. त्याचा फटका खैरैंना बसणार अशी चर्चा आहे.
गंगापूर - भाजपचे प्रशांत बंब या ठिकाणी आमदार आहेत. खैरै आणि बंब यांच्यातही आता वाद निर्माण झाला आहे.
वैजापूर - गेल्या विधानसभा निवडणुकात शिवेसेनेच्या उमेदवाराचा पराभव करीत राष्ट्रवादी काँग्रेसनं ही जागा जिंकली आहे. गेल्या चार वर्षात शिवसेनेचं प्रस्थ इथं बऱ्यापैकी कमी करण्यात आमदार चिकटगावकरांना यश आल्याचं मानलं जातं आहे.
कन्नड - कन्नड हा खैरैंचा बालेकिल्लाच मात्र इथले शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीच आता खैरेंविरोधात स्वतःची लोकसभा उमेदवारी जाहीर केली आहे.
मात्र आपलं कामच आपल्या विजय मिळवून देईल असा विश्वास खैरेंना आहे. खैरेंना विजयाचा विश्वास असला तरी त्यांची देहबोली त्यांना साथ देत नाही. वाढत्या विरोधानं खैरे धास्तावलेत अशी चर्चा आहे. त्यामुळे सर्व विरोधकांवर मात करत खैरे विजय साकारणार का हे पाहावं लागेल.