Lok Sabha Election 2024 : उत्तर पश्चिम मुंबई... अर्थात वायव्य मुंबई... वर्सोवा अंधेरीपासून दिंडोशी गोरेगावपर्यंतचा पश्चिम उपनगराचा भाग... मुंबईतलं जंगल अशी ओळख असलेली आरे कॉलनी, सरकारी दूध उत्पादन केंद्र असलेली महानंदा डेअरी, बॉलिवूडचा आधार असलेली फिल्मसिटी, जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेली जुहू चौपाटी याच मतदारसंघात येते. संमिश्र लोकवस्ती असल्यानं मिनी इंडिया अशी या मतदारसंघाची ओळख. मुंबईचं उपनगर असूनही इथल्या समस्या वर्षानुवर्षं सुटलेल्या नाहीत. इथं पत्राचाळसारखे अनेक पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षं रखडलेले आहेत. बैठ्या चाळींच्या पुनर्विकासाचं आश्वासन पूर्ण झालेलं नाही. विमानतळ परिसरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही कायम आहे. वन जमिनींवरील आदिवासी पाड्यांचा प्रश्न सुटलेला नाही. वाहतूक समस्या तर पाचवीलाच पुजलीय. एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सध्या हा गड शिवसेनेचा बालेकिल्ला बनलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर पश्चिम मुंबईचं राजकीय गणित 


2009 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत यांनी शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना 38 हजार मतांनी हरवलं. 2014 मध्ये मोदी लाटेत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांनी पराभवाचा वचपा काढला. त्यांनी गुरुदास कामतांना पराभूत केलं. 2019 मध्ये पुन्हा एकदा कीर्तिकर खासदार झाले. त्यांनी काँग्रेसच्या संजय निरुपमांचा दारुण पराभव केला. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 3, शिवसेना ठाकरे गटाचे 2 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 आमदार आहे.


शिवसेनेतल्या फुटीनंतर विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर शिवसेना शिंदे गटात गेले. तर त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर ठाकरे गटातच राहिले. आता ठाकरे गटानं लोकसभेसाठी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिलीय. तर मुलाच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, अशी भूमिका गजानन कीर्तिकरांनी घेतलीय. त्यामुळं महायुतीचा उमेदवार कोण, हा तिढा अजून सुटलेला नाही. शिवसेना शिंदे गटाकडून जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा आहे. अमोल कीर्तिकरांवर खिचडीचोर अशी टीका करत त्यांचं काम करायला संजय निरुपमांनी नकार दिला. त्यामुळं त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलीय. ते देखील शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजतंय. त्याशिवाय एखाद्या सिने कलावंताला रिंगणात उतरवण्याच्या दृष्टीनं देखील चाचपणी सुरू आहे.


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेले रवींद्र वायकर आणि पालापाचोळ्यासारखे उडत आलेले महाराष्ट्रद्रोही संजय निरुपमांना पाठिंबा देणार नाही, असा इशारा मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनी दिलाय. त्यामुळं महायुतीची आणखीच कोंडी झालीय. अमोल कीर्तिकरांसाठी शिवसेना ठाकरे गट पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरलाय. तर दुसरीकडं सत्ताधारी शिंदे गटाला अजून उमेदवारच सापडत नाहीय. शिंदे गट कुणाला आता कुणाला घोड्यावर बसवणार, याचीच चर्चा उत्तर पश्चिम मुंबईत आहे.