Nitin Gadkari vs Congress : नागपूर... महाराष्ट्राची उपराजधानी... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रेशीमबाग मुख्यालय इथंच आहे. ज्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ती दीक्षाभूमी देखील नागपूरचीच.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं होमपिच... त्यामुळं आयआयटी, आयआयएम, एम्स, कायदा विद्यापीठ, सिम्बॉयसीस, मिहान प्रकल्प, उड्डाणपुल, मेट्रो रेल, रस्त्यांचं जाळं अशी विकासाची गंगा नागपुरात पोहोचलीय... मात्र तरीही अनेक प्रश्न कायम आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या समस्या


नागपुरात पायाभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवले तरी अनेक प्रकल्पांच्या कामात सुसूत्रता नसल्यानं नागपूरकर त्रासलेले आहेत
सीमावर्ती भागात पाण्याची समस्या कायम आहे. नाग नदीनं दिलेला महापुराचा तडाखा अजूनही नागपूरकरांच्या स्मरणात आहे. नाग नदी सौंदर्यीकरण कधी होणार, असा सवालही ते करतायत. बड्या कंपन्या, उद्योगसमूहांचा अजूनही अभाव आहे. त्यामुळं पाहिजे तेवढी रोजगारनिर्मिती झालेली नाही.


खरं तर नागपूर मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला... 1998 पासून लागोपाठ चारवेळा काँग्रेसचे विलास मुत्तेमवार नागपुरात खासदार म्हणून विजयी झाले. 


नागपूरचं राजकीय गणित


2009 मध्ये मुत्तेमवारांनी भाजपचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहितांना २४ हजार मतांनी हरवलं. मात्र, २०१४ च्या मोदी लाटेत फासे पलटले. नितीन गडकरी मैदानात उतरले आणि त्यांनी मुत्तेमवारांना तब्बल पावणे तीन लाख मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. 2019 मध्ये पुन्हा एकदा गडकरींनी काँग्रेसच्या नाना पटोलेंना २ लाखांहून अधिक मताधिक्यानं धूळ चारली. विधानसभा मतदारसंघावर नजर टाकली तर नागपूरमधून भाजपचे 4 आमदार निवडून आलेत. तर नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या मतदारसंघात काँग्रेसचे 2 आमदार विजयी झालेत.


आता नितीन गडकरी विजयाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज झालेत. तर काँग्रेसकडून आमदार अभिजीत वंजारी, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार, प्रफुल्ल गुडधे, नितीन कुंभलकर यांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.


नागपुरात आंबेडकरी विचारांच्या मतदारांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांची मतं बसपा आणि इतर पक्षांमध्ये विभागली जातात. कुणबी समाज मोठ्या संख्येनं आहे. त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा थोडाफार परिणाम इथं पाहायला मिळू शकतो. त्याशिवाय तेली, ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. नागपुरात भाजप आणि काँग्रेस अशीच थेट दुरंगी लढत रंगते. इतर पक्षांना फारसं स्थान नाही.


एकीकडं विकासपुरूष अशी ओळख असलेला नितीन गडकरी यांच्यासारखा हेवीवेट नेता... तर दुसरीकडं त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसचा कुणीही बडा नेता उत्सूक नाही, असं नागपुरातलं सध्याचं चित्र आहे. त्यामुळं गडकरींची हॅटट्रिक रोखण्यासाठी काँग्रेस नेमकी कोणती जादूची कांडी फिरवणार?, हाच मोठा प्रश्न आहे.