लोकसभेचा फॉर्म्युला ठरला, 32 जागांवर भाजपचेच उमेदवार; शिंदे, दादांना किती जागा?
Lok Sabha Election 2024: भाजप राज्यात सर्वाधिक जागा लढवणार असल्याची माहिती समोर येतेय. शिंदे अन् अजित पवार गटाला किती जागा मिळणार? वाचा
Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार याची देशात उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यातही निवडणुकीचे पडसाद उमटायला लागले आहेत. भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या भाजप-शिवसेना (शिंदे गट)- राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीतही महायुती लढणार आहेत. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाच्या चर्चांवरुन वातावरण तापलं होतं. मात्र, अखेर भाजपकडून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप राज्यात सर्वाधिक 32 जागांवर लढणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
सूत्रांनुसार, राज्यात भाजप 32 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. अजित पवार गटाला ६ तर शिंदे गटाला 10 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला 10 जागा दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. तर, राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. अजित पवार गटाला सातारा, रायगड, मावळ, बारामती, शिरूर, भंडारा गोंदिया मतदारसंघ मिळणार असल्याची माहिती समोर येतेय.
भाजप 32 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. लोकसभेसाठी भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना हे सूत्र ठरलं आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने महायुतीत भाजप मोठा भाऊ असणार स्पष्ट होतंय. मेरिटनुसार, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार किती जागांवर निवडून येऊ शकतात याचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यामुळं जे उमेदवार निवडून येऊ शकतात त्यांनाच तिकिट द्यायचे, असे ठरले आहे. या संदर्भात निश्चिततादेखील झाली आहे. त्याची आकडेवारीही भाजपकडे आहे. त्यामुळंच भाजप सर्वाधिक म्हणजेच 32 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती कळतेय.
मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांची युती होती. भाजपसोबत शिवसेना होती त्यामुळं जागावाटपाबाबत दोन्ही पक्षात चढाओढ पाहायला मिळाली होती. मागील लोकसभेला भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता मागील निवडणुकीच्या तुलनेने 9 जागा अधिक भाजपच्या वाटेला आल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या गटाला 10 जागा मिळणार असल्याचे बोलले जाते. मात्र हे दहाही उमेदवार निश्चित निवडून येतील याची खात्री बाळगली जात आहे. जागावाटपाबाबत प्राथमिक स्तरावर बोलणी आहे. लवकरच याला अंतिम स्वरुप देण्यात येईल, अशी माहिती कळतेय.