लोकसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्रातही भाजपकडून बिहार पॅटर्न?
भाजप आणि शिवसेनेत समसमान जागा वाटप होणार असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु आहे.
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेचे भाजपसोबत असलेले नाते दिवसेंदिवस अडचणीत येत असल्याचे दिसते आहे. शिवसेना सत्तेत असून देखील भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. असाच वाद बिहारमध्ये सुरु होता. बिहारमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेड (जदयू) आणि लोक जनशक्ती पार्टी (लोजपा) या दोन पक्षांशी सुरु असलेल्या जागावाटपाचा वाद आता थांबला आहे. या तीन पक्षांमध्ये जागावाटपाचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता भाजप महाराष्ट्रात बिहार पॅटर्न लागू करण्याच्या तयारीत आहे. भाजप आणि शिवसेनेत समसमान जागा वाटप होणार असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु आहे. भाजप युतीसाठी आग्रही आहे. परंतु,शिवसेनेकडून युतीबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपला तीन राज्यातील सत्ता गमावावी लागली. यामुळे भाजप मित्रपक्षांसोबत खेळीमेळीच वातावरण निर्माण करत आहे. तसेच भाजपच्या पराभवामुळे मित्रपक्षाच्या भूमिकेत देखील बदल झाला आहे. याचा परिणाम बिहारमध्ये पाहायला मिळाला. लोजपच्या दबावतंत्रामुळे त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यात महाराष्ट्रात शिवसेना भाजपवर सतत टीका करत आहे. राजकीय सूत्रांनुसार, महाराष्ट्रात सद्यपरिस्थितीत भाजपने एक सर्वेक्षण केलं आहे, त्यानुसार, गेल्या लोकसभा निवडणुकीनुसार सेना-भाजपने एकत्रित निवडणूक लढवल्यास चांगले निकाल येतील. तर दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास याचा तोटा होण्याची भीती व्यक्त केली आहे.
शिवसेनेची नाराजी
महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यापासून शिवसेनेचे नाराजीनाट्य सुरु आहे. शिवसेनेला राज्यात उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रात कमी दर्जाचे मंत्रिपद दिल्याने शिवसेना नाराज आहे. जागावाटपावरुन भाजपने नेहमीच शिवसेनेला गृहीत धरले आहे. त्यामुळे नेहमी शिवसेनेकडून होणाऱ्या विरोधानंतर देखील भाजपकडून त्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली जात नाही. तसेच मुख्यमंत्री फडणवीस राजकीय मंचावरुन युतीसाठी आग्रही भूमिका घेत असतात.