Loksabha 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Loksabha Constituency) हा राज्यातलाच नव्हे तर देशातलाही प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनलाय. कारण इथे लढाई रंगतेय ती पवार विरुद्ध पवार (Pawar vs Pawar) यांच्यात. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Aji Pawar) पहिल्यांदाच निवडणुकीत आमने सामने आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजयी अशी लढत बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता पवार कुटुंबातील दोन महिला या निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर आल्या आहेत. राष्ट्रवाद शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रातून खुलासा
दोन्ही गटांकडून आपापल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरु आहे.  सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आलं. या सर्व घडामोडींदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उमदेवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे ज्यांच्याविरुद्ध लढणार आहेत, त्याच सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याकडून 55 लाख रुपये उसणे घेतले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर भावजय आणि भाच्याचं एकूण 55 लाखांचं कर्ज आहे, अशी माहिती समोर आली आहे.


अर्ज भरताना कडक नियम
केंद्रीय निवडणूक आयोगाने आता उमेदवारी अर्ज भरताना नियम कडक केले आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराची काही वैयक्तिक माहिती देखील विचारण्यात येते. यामध्ये उमेदवाराची एकूण संपत्ती किती, उत्पन्न किती आणि कर्ज किती, याबाबतची माहिती विचारली जाते. तसंच उमेदवारांच्या कुटुंबियांच्या नावावर किती संपत्ती आहे, याची देखील माहिती प्रतिज्ञापत्रावर द्यावी लागते. सुप्रिया सुळे यांनी आज अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात सुप्रिया सुळे यांनी आपल्यावर 55 लाखांचं कर्ज असल्याचं सांगितलं आहे.


पार्थ पवार यांच्याकडून 22 लाखांचं कर्ज
आपण वहिनी सुनेत्रा पवार आणि भाचा पार्थ पवार यांच्याकडून एकूण 55 लाखांचं कर्ज घेतल्याची माहिती सुप्रिया सुळे यांच्याकडून प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.  सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडून 22 लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे. तर सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही बँकेचं कर्ज सुप्रिया सुळे यांनी घेतलेलं नाही.  सुप्रिया सुळे या 142 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत, अशी देखील माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याला यंदा शेतीतून शून्य उत्पन्न मिळाल्याचं देखील नमूद केलं आहे.