`चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल`
Loksabha 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितित मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाला.
Loksabha 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितित मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाला. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील याच्या मनगटावर शिवबंधन बांधलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी या मर्दाची छाती पाहिल्यानंतर सांगलीत आपल्याशी लढण्याची छाती कोणचाी होणार नाही असं म्हटलं, तसंच संपूर्ण महाराष्ट्रात आणि एकूण राजकारण बघता, पक्षातून नामर्द पळून जातायत, पण मर्द शिवसेनेत येतायत, शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना राहिलीय. लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल असं म्हटलंय.
गदा आणि मशाल ही नेही मर्दाच्या हाती शोभतं, आता ही गदा आणि मशाल घेऊन आपल्याला सांगलीतून एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित केलंय. आता लवकरच सांगलीचा दौरा करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. गद्दारांना आडवं करायचं आहे, भविष्य तुमच्या हाती आहे, जनता आपल्याकडे अपेक्षेने पाहतेय, आजच्या पक्षप्रवेशामुळे जनतेला हे कळलंय, आपल्यासाठी लढणारे मर्द आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया
एका शेतकऱ्याच्या मुलाला जो मानसन्मान दिलात, त्याबद्दल मनापासून आभार असं म्हणत चंद्रहाट पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे आभार मानले. यावेळी चंद्रहार पाटील यांच्या सहकाऱ्यांनी अब की बार चंद्रहार अशा घोषणा दिल्या.
चंद्रहार पाटील निवडणुकीच्या आखाड्यात?
महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तीढा सूटल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रीत केलंय. मातोश्रीवर सांगली लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार यावर चर्चा करण्यात आली. या मतदार संघातून माजी हिंद केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil)ला लोकसभा उमेदवारी मिळणार हे आता जवळपास निश्चित झालंय.
काही दिवसांपूर्वी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. सांगली लोकसभा मतदारसंघ जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा दिला आहे
चंद्रहार पाटील निवडणुकीच्या तयारीला
चंद्रहार पाटील गेल्या चार महिन्यांपासूनची लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. रक्तदान चळवळीच्या माध्यमातून त्याने जिल्ह्यातील गावागावात संपर्क सुरु केला आहे. सैनिकांसाठी महारक्तदान यात्रेचंही आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.