नाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? `या` दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद
Loksabha 2024 : महाविकास आघाडीने लोकसभेचं जागावाटप फायनल झाल्याचं जाहीर केलं खरं. मात्र अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटात धुसफूस सुरु आहे. जागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य सुरु आहे.
Loksabha 2024 : लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद (Congress vs Shivsena UBT) काही संपताना दिसत नाहीए.. मुंबईच्या जागावाटपात विश्वासात घेतलं नाही असा आरोप करत वर्षा गायकवाडांनी (Varsha Gaikwad) स्वपक्षावरच नाराजी बोलून दाखवली. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी मुंबईतल्या जागांसाठी फारसा आग्रह धरला नसल्याचा आरोपही वर्षा गायकवाडांनी केलाय.. वर्षा गायकवाड यांनी मुंबईतल्या जागावाटपाबाबतची तक्रार दिल्लीत हायकमांडकडेही केलीय..
दुसरीकडे सांगलीवरुनही ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये कुस्ती रंगलीय. सांगलीत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) परस्पर उमेदवार जाहीर केला. शिवसेनेची कोल्हापूरची जागा शाहू महाराजांमुळे काँग्रेसकडे गेली. तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात एकतरी जागा असावी म्हणून सांगलीची जागा मागितल्याचा दावा ठाकरे गटाने केलाय. सांगली हा स्वातंत्र्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला. तेव्हा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद नसताना.. दुसरीकडे काँग्रेसची ताकद आणि संघटनाही असताना सांगलीची जागा ठाकरे गटाला का असा सवाल काँग्रेस नेते करतायत..
मविआ नेत्याने फूस लावली?
दुसरीकडे मविआतल्याच एका नेत्याने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला फूस लावल्याचा संशय काँग्रेस नेत्यांना आहे. या नेत्याला सांगलीत काँग्रेसचं वर्चस्व नको असल्याचा आरोपही सांगली जिल्ह्यातले नेते खासगीत करतायत. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांचीही भेट घेतली. त्यामुळे विशाल पाटील आता वंचितच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याचीही चर्चा सुरु झालीय..
सांगलीत ठाकरे गटाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिलीय. दुसरीकडे सांगलीचे स्थानिक काँग्रेस नेते मात्र ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात उभे ठाकलेयत. मविआतल्या नाराजीनाट्यामुळे सांगलीमध्ये महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची चिन्हं दिसतायत.
अमित शहांना प्रत्युत्तर
दरम्यान, राज्यात दोन नकली पक्ष, एक शिवसेना दुसरी राष्ट्रवादी असं म्हणत अमित शाहांनी (Amit Shah) उद्धव ठाकरे आणि पवारांना डिवचलं. यावरून जयंत पाटलांनी शाहांना प्रत्युत्तर दिलंय. एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला नकली म्हणायचं. आता जनतेलाच ठरवू दे कोण नकली आणि कोण असली, असा टोला जयंत पाटलांनी (Jayant Patil) लगावलाय. तर 2019 साली पाठिंबा मागण्यासाठी मातोश्रीवर नाक रगडत का आला होता...? असा सवाल संजय राऊतांनी (Sanjay Raut) विचारलाय. शाहांनी डुप्लिकेट पक्ष स्थापन केलेत त्याचा निकाल जनता लावल्याशिवाय राहणार नाही असा पलटवार राऊतांनी केलाय.