मतदारसंघ एक उमेदवार अनेक, त्यात मनसेचीही भर... आढावा शिर्डी मतदारसंघाचा
Loksabha 2024 : शिर्डीमध्ये अजून लोकसभा उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीसह महाविकास आघाडीतही उमेदवारावरून रस्सीखेच सुरूय. नेमकं काय आहे शिर्डीतील राजकीय चित्र. पाहूयात हा रिपोर्ट...
कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : शिर्डी... जगभरातील भाविकांना श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांची शिर्डी (Shirdi Contstituency). अहमदनगर जिल्ह्यातल्या दोन लोकसभा मतदारसंघापैकी एक. पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ. मात्र 2009 सालच्या पुनर्रचनेनंतर शिर्डी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. तरीही इथल्या नागरिकांच्या अडचणी काही सुटल्या नाहीत.
शिर्डीतील रखडलेले प्रश्न
आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र असूनही शिर्डीचा व्हायचा तसा विकास झाला नाही. शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न वर्षानुवर्षं प्रलंबित आहे. निळवंडे धरणाचा कालवा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना अडचणीचं ठरलेलं निर्यात धोरण अजून बदललेलं नाही
बाळासाहेब विखे पाटलांच्या काळात कोपरगाव, शिर्डी भागात काँग्रेसचं (Congress) वर्चस्व होतं. मात्र 2009 साली मतदारसंघ राखीव झाल्यापासून लागोपाठ तीनवेळा शिवसेनेचाच खासदार विजयी झालाय.
शिर्डीचं राजकीय गणित
2009 मध्ये शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरेंनी रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला. 2014 मध्ये भाऊसाहेब वाकचौरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळं ऐनवेळी माजी आमदार सदाशिव लोखंडेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली. मोदी लाटेत लोखंडेंनी काँग्रेसच्या वाकचौरेंचा सुमारे 2 लाख मतांनी पराभव केला. 2019 मध्ये लोखंडेंनी काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळेंना सव्वा लाख मतांनी हरवलं. विधानसभेचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, काँग्रेसचे 2 आणि भाजप-शिवसेनेचा प्रत्येकी 1 आमदार विजयी झालेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडेंनी एकनाथ शिंदेंसोबत जाणं पसंत केलं. ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघावर आता भाजपनं दावा केलाय. राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजप उमेदवारीसाठी शक्ती पणाला लावलीय. शिवसेना की भाजप, असा तिढा महायुतीत निर्माण झाला असताना रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवलेंनीही त्यात उडी घेतलीय. लोखंडेंना राज्यसभेवर पाठवावं आणि शिर्डीची उमेदवारी आपल्याला द्यावी, असा प्रस्ताव आठवलेंनी महायुतीपुढं ठेवलाय.
दुसरीकडं महाविकास आघाडीतही शिर्डीच्या जागेवरून रस्सीखेच सुरूय. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतलेत. शिर्डीतून उमेदवारीसाठी त्यांनी मातोश्रीपर्यंत फिल्डिंग लावलीय. मात्र त्यांच्यावर बौद्ध समाज नाराज असल्याचं समजतंय. काँग्रेसकडून राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्ष रुपवते या देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दक्षिण नगरमधून भाजपनं उमेदवार जाहीर केला... मात्र शिर्डीत उमेदवारीसाठी चढाओढ असल्यानं अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही.
मतदारसंघ एक आणि उमेदवार अनेक अशी शिर्डीत अवस्था आहे. त्यात आता मनसेचीही भर पडलीय. राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर, शिर्डी मतदारसंघातून बाळा नांदगावकांच्या नावाची चर्चा सुरू झालीय... त्यामुळं राजकीय गुंता आणखी वाढलाय...