Sharad Pawar PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पुण्यातल्या सभेत शरद पवारांवर (Sharad Pawar) केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्यायत.  'महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात काही भटकत्या आत्मा (Wandering Soul) असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे, असं वक्तव्य पीएम मोदी यांनी केलं होतं. यावर आता स्वत: शरद पवार यांनी उत्तर दिलंय. 'होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन' असं शरद पवारांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले शरद पवार?
पंतप्रधान काल म्हणाले ईडीचा मी एक टक्का ही वापर करत नाही. जनतेचा ज्यांच्यावर विश्वास त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय.
माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्या बद्दल काय बोलतात. एक आत्मा भटकत आहे असं तुम्ही म्हणाले, त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, अस मोदी म्हणाले. पण हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. हे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही, असं सडेतोड उत्तर शरद पवार यांनी दिलंय.


राहुल गांधींवर टीका करणाऱ्यावरही शरद पवार यांनी खडेबोल सुनावले आहेत. 'राहील गांधींवर टीका करतात. शहाबजादे क्या करेंगे? मोदींना कायतरी वाटायला हवं, राहुलच्या तीन पिढ्या देशासाठी झटल्या आहेत. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी झटले आहेत. गरिबी हटविण्यासाठी इंदिरा गांधींची हत्या झाली. अधुनिकेतवर देश पुढं जावा, यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात शहाबजादे काय करणार? कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. पण याबाबत बोलण्याऐवजी मोदी काहीही बोलतायेत. खोट्या गोष्टी सांगत, चुकीच्या पद्धतीने टीका टिपणी करत असतील. तर अशांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय.


विरोधकांचा हल्लाबोल गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय, आम्ही त्यांचा बदला घेऊ अशा शब्दांत संजय राऊतांनी पलटवार केलाय. तर शरद पवारच महाराष्ट्राचा आत्मा असल्याचं मोदींना मत मोजणीनंतर समजेल अशा शब्दांत जयंत पाटलांनी टीका केलीय. कालच्या पुण्यातल्या सभेत मोदींनी पवारांचं नाव न घेता भटकती आत्मा अशी टीका केली होती. त्यावर आज राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत. मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरुन अमोल कोल्हेंनी अजित पवारांना घेरलंय. अजित पवारांना हा आरोप मान्य आहे का? मूग गिळून त्यांनी हे सिद्ध केलंय.. असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केलीय. शरद पवारांवर केलेल्या या टीकेवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. मोदी घाबरल्यामुळे पातळी सोडत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 


अजित पवारांचं प्रत्युत्तर
पीएम मोदींनी केलेल्या भटकती आत्मा या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. मोदींनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. लोकांनी काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, मी मोदींना भटकती आत्मा कुणाला म्हणाले याबाबत विचारणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.