Loksabha 2024 :  कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं वर्चस्व आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेना गटाकडून वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Loksabha Constituency) ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. सोमवारी वैशाली दरेकर यांच्या प्रचार रॅलीत एक वेगळचं दृष्य पाहायला मिळालं. यामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैशाली दरेकर यांचा प्रचार
सोमवारी मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची प्रचार रॅली काढण्यात आली. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सहभागी झाले होते. प्रचार रॅलीत जीपमध्ये खासदार संजय राऊत आणि वैशाली दरेकर होत्या. पण सर्वांचं लक्ष वेधलं होतं ते जीपमध्ये सर्वात पुढे असलेल्या सुलभा गायकवाड यांनी.


कोण आहेत सुलभा गायकवाड?
आता सुलभा गायकवाड यांची ओळख करुन घेऊयात. कल्याण पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या सुलभा गायकवाड या पत्नी. सुलभा देशपांडे ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांच्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या. 


सुलभा गायकवाड ठाकरेंच्या उमेदवारासोबत दिसल्यानंतर मतदारसंघात एकच बोभाटा झाला. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रचंड वितुष्ट आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतला वाद संपला नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण त्यानंतर सुलभा गायकवाड यांनी माध्यमांसमोर येत ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होण्यावरुन सारवासारव केली.  गोरपे गावातील प्रचार फेरीत सहभागी असलो तरी आपण दरेकर यांचा प्रचार केला नाही किंवा त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत, असे स्पष्टीकरण सुलभा गायकवाड यांनी दिलं.


नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी पूर्ण ताकदीने भाजप समर्थक उमेदवाराचा प्रचार करणार आहोत. आपल्यावर महायुती किंवा महाआघाडीकडून कोणाचाही दबाव नाही, असंही सुलभा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. 


कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटासाठी प्रतिष्ठेचा आहे.. श्रीकांत शिंदे यांच्याविरुद्ध वैशाली दरेकर रिंगणात उतरल्या आहेत.. मात्र भाजप आमदाराची पत्नीच वैशाली दरेकरांसोबत दिसल्याने शिंदे गटाची धाकधूक वाढलीय.