Loksabha 2024 Ramdas Kadam On Seat Sharing: महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीचा दौरा करणार असून लवकरच महायुतीच्या सर्व जागांचं वाटप होईल आणि उमेदवार जाहीर केले जातील असं सांगितलं जात आहे. भारतीय जनता पार्टीने ज्या जागांवर कोणताही वाद नाही अशा 20 जागांवर या पूर्वीच उमेदवार जाहीर केले आहेत. असं असतानाच आता जागावाटपासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या जागा जिंकतील की तो विजय उद्धव ठाकरेंना कानफाटीत मारल्यासारखा असेल असं रामदास कदम म्हणाले आहेत.


उद्धव ठाकरेंना कानफाटीत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना रामदास कदमांनी लवकरच एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल असा विश्वास व्यक्त केला. "पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आपल्याला पाहायला मिळेल. ती यादी अतिशय समाधानकारक असेल. त्यामध्ये कुठलीही अडचण नसणार. शिवसेना-भाजपा युती आजची किंवा कालची नाही. ही युती भावनात्मक दृष्टीने जोडलेली आहे. या युतीचा निश्चितपणे सन्मान केला जाईल. उद्धव ठाकरेंना कानफाटीत बसेल अशा जागा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा आणून दाखवतील, हा विश्वास व्यक्त करतो," असं रामदास कदम म्हणाले.


शिंदे गटाने किती जागा मागितल्या?


भाजपाच्या काही जागा शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे गटाकडून) मागितल्या जात आहेत. रत्नागिरी, दक्षिण मुंबई असेल यासारख्या जागांबद्दल काय सांगाल? या प्रश्नाला उत्तर देताना रामदास कदमांनी, "आम्हाला कुठेही अडचण येणार नाही," असं सांगितलं. "कदाचित एखादी दुसरी जागा बदलली जाईल. सगळा निर्णय समाधानकारक असेल," असं रामदास कदम म्हणाले. किती जागा लढवणार? या प्रश्नाला कदमांनी, "आम्ही ज्या लढलो होतो त्या 22 जागा मागितल्या आहेत," असं उत्तर दिलं.


नक्की वाचा >> 'उतार वयात कंटाळा आला तर..', अजित पवारांचा शरद पवारांना टोला; केली सुप्रिया सुळेंची मिमिक्री


मागितलेल्या जागा मिळाल्या नाही तर...


शिंदे गटाच्या मागणीप्रमाणे महायुतीच्या जागावाटपामध्ये 22 जागा नाही मिळाल्या तर भूमिका काय असेल? असा प्रश्न रामदास कदमांना विचारण्यात आला. त्यावर, "भूमिका काही नसेल. आम्हाला माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना या देशाचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून बसवायचं आहे. त्यासाठी आम्ही त्यासाठी तडजोड केल्याशिवाय राहणार नाही. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवल्याशिवाय राहणार नाही," असं रामदास कदम म्हणाले.