Nashik Loksabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीत (NCP) रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या जागेवरुन वाद सुरु असतानाच आता भाजपनेही (BJP) एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीवरुन नवा ट्विस्ट आला आहे.  'नाशिकमधून प्रीतम मुंडे यांना उभं करेन', असं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला पंकजा मुंडे?
बीड लोकसभा मतदरासंघातून भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचं तिकिट कापून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचं काय होणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला. या प्रश्नांना उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी बीडच्या एका सभेत प्रीतम मुंडे यांच्याबाबत सूचक विधान केलं.  प्रीतम मुंडेंची काळजी करू नका. मी तिला नाशिकमधून उभी करेन या पंकजा मुंडेंच्या विधानानंतर महायुतीत एकच खळबळ उडालीय. प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, हा मी शब्द दिला होता, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.


महायुतीत नाशिकची जागा प्रतिष्ठेचा विषय बनली असली तरी तिथला उमेदवार ठरत नाहीए. मात्र पंकजा मुंडेंनी नाशिकसाठी प्रीतम मुंडेंचा दावा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. प्रीतम मुंडेंचा विवाह नाशिकच्या डॉक्टर गौरव खाडे यांच्याशी झाला आहे. त्यात नाशिकसाठी छगन भुजबळांनी माघार घेतल्यानंतर आता भाजपकडून प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत आलंय. पंकजा मुंडेंच्या या विधानानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतल्या दोन ओबीसी नेत्यांमध्येच जुंपलीय. बीडमधून निवडून येणं महत्त्वाचं आहे.. तेव्हा पंकजा मुंडेंनी बीडवर लक्ष केंद्रीत करावं असा सल्ला छगन भुजबळांनी दिलाय. 


छगन भुजबळांचा पुन्हा दावा
छगन भुजबळांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. पण भुजबळांनी नाशिकच्या जागेवर पुन्हा राष्ट्रवादीचा दावा सांगितलाय. त्यातच नाशिकची जागा छगन भुजबळांनी लढवावी असा ठराव समता परिषद, ओबीसी संघटनांनी केलाय. तर भुजबळांनी घ्याव्या लागलेल्या माघारीचे पडसाद माळी समाजातही उमटतायत. 


शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना हा मतदारसंघ हवाय. तर शिंदे गटाचेच अजय बोरस्तेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. गोडसेंनी तर प्रचारालाही सुरुवात केलीय. अजित पवार गटानेही नाशिकवरचा दावा कायम ठेवलाय.  नाशिकची जागा शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तीन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरलाय. त्यात पंकजा मुंडेंच्या घोषणेमुळे नाशिकचा तिढा आणखीनच गुंतागुंतीचा झालाय.. आता नाशिकची जागा नेमकी कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.