Loksabha 2024 Baramati Constituency : बारामती, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात प्रतिष्ठेचा राहिलेला मतदारसंघ. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासमोर घरातल्याच उमेदवाराने आव्हान उभं केलं. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका आणि पुतण्या या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली राज्यातली ही सर्वाधिक चुरशीची लढत. बारामतीतली लढाई सर्वात हाय व्होल्टेज असली तर मतदानाच्या बाबतीत मात्र निरुत्साहच पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामतीत मतदानाचा टक्का घसरला (Baramti Voting Percentage)
2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात 56.07% मतदान झालं. तर 2019 मध्ये 61% मतदान झालं होतं. बारामतीत झालेल्या विधानसभानिहाय मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यावरही याचं चित्र स्पष्ट होतंय.. 


भोरमध्ये यंदा 59% तर 2019 मध्ये 60.84% मतदान झालं होतं.
खडकवासल्यात यंदा 43 टक्के तर 2019 मध्ये मात्र 53.20 टक्के मतदान झालं होतं.
बारामतीमध्ये यंदा 64 टक्के मतदान झालं, तोच आकडा 2019 मध्ये 70.24 टक्के एवढा होता.
दौंडमध्ये यंदा 59 टक्के मतदान झालं, तेच 2019 मध्ये 64.05 टक्के एवढं मतदान झालं होतं.
पुरंदरमध्ये यंदा 48 टक्के तर 2019 मध्ये 60.48 टक्के मतदान झालं होतं.
इंदापूरमध्ये यंदा 61.82 तर 2019 मध्ये 64.39 टक्के मतदान झालं होतं.


याचा अर्थ बारामती लोकसभा मतदारसंघातील एकाही विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी इतकं किंवा त्यापेक्षा अधिक मतदान झालं नाही. अटीतटीच्या लढतीत मतदानाची टक्केवारी वाढणं अपेक्षित असताना राज्यातील इतर ठिकाणी बघायला मिळायला ट्रेण्ड बारामतीतही कायम राहिला; ही बाब अनपेक्षित म्हणावी अशीच आहे.. 


बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती आणि खडकवासला हे दोन विधानसभा मतदारसंघ निर्णायक ठरतात. बारामती कायम पवारांना तर खडकवासला भाजपला आघाडी देत आलाय. यावेळी पवारांमध्ये फूट पडलीये तर भाजपने नवीन मित्र जोडलेत.  बारामतीमधली एकूण मतदार संख्या 21 लाखावर होती. यंदा त्यात भर पडून ही संख्या 23 लाख 72 हजार 668 इतकी झाली. असं असलं तरी मतदानाची टक्केवारी घटली आहे. गेल्या वेळी सुमारे 13 लाख मतदान म्हणजे 61 टक्के मतदान झालं होतं. यावेळी त्यात पाच टक्क्यांची घट झालीय. मात्र अटीतटीच्या लढाईत 5 टक्क्यांची घटही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.