Loksabha 2024 : महायुतीत (Mahayuti) अजूनही 7 लोकसभा मतदारसंघांचा तिढा सुटलेला नाही, तर मविआत (Mahavikas Agadhi) मुंबईतील दोन जागांचा वाद कायम आहे. या सर्व मतदारसंघांसाठी पाचव्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मतदान होतंय.. तांत्रिकदृष्ट्या मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला बराच वेळ आहे. त्यामुळे वाटाघाटींसाठी राजकीय पक्षांचं हायकमांड वेळ घेतंय. मात्र याचा उलट परिणाम असा होतोय की इच्छुक उमेदवारांचं टेन्शन वाढलंय. कारण उमेदवार ठरत नाही तोपर्यंत प्रचारात उमेदवाराचा चेहरा घेऊन प्रचार करता येत नाही. ना सभा घेता येतात ना प्रचार फेरी काढता येतात ना प्रचारपत्रकं छापता येतात. साहजिकच  प्रचाराचा कालावधी कमी होतोय. त्यामुळे महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील इच्छुकांची डोकेदुखी वाढलीय.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीत या जागांवरील तिढा कायम 
मुंबई उत्तर पश्चिम
मुंबई उत्तर मध्य
मुंबई दक्षिण 
ठाणे
पालघर
कल्याण 
नाशिक 


मविआचा उमेदवार ठरेना  
मुंबई उत्तर मध्य
मुंबई उत्तर 


पाचव्या टप्प्यातील या सर्व मतदारसंघात 18 मेपर्यंत प्रचार करता येणार आहे. 3 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. आयत्यावेळी उमेदवारी जाहीर झाल्यास प्रत्यक्ष प्रचाराला 20 ते 22 दिवसच मिळू शकतात. एका लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ पकडले तरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी जास्तीत जास्त 3-4 दिवस मिळतील. त्यामुळे इच्छुकांचं टेन्शन वाढलंय. इतक्या कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणार कसं.. याचं टेन्शन इच्छुकांना आहे.


नाशिकचा तिढा सुटेना
नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही सुटताना दिसत नाहीए. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळांनी नाशिकमधून माघार घेतली. मात्र आता भाजपकडून इच्छुक उमेदवारांनी नाशिक लोकसभेची ही जागा भाजपसाठी मागितलीय.. त्यासाठी भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट पत्र पाठवलं आहे.


बंडखोरीचाही फटका
महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचाही सामना करावा लागतोय. सांगलीतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांनी केलाय. विशाल पाटलांचं बंड शमवण्यात काँग्रेस नेत्यांनी सपशेल अपयश आलं. त्यामुळं आता सांगलीत ठाकरेंची मशाल विरुद्ध बंडखोर विशाल असा थेट सामना रंगणाराय. शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात विशाल पाटील शड्डू ठोकून आखाड्यात उतरलेत. 
विशाल पाटलांचं बंड थोपवण्याची जबाबदारी बाळासाहेब थोरातांना देण्यात आली होती. विशाल पाटलांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देण्यात आला. मात्र त्यांनी ही ऑफर धुडकावून लावली आणि बंडाचा झेंडा कायम ठेवला. त्यामुळं आता त्यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.