महायुतीत नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट, माघारीचा निर्णय छगन भुजबळ बदलणार?
Loksabha 2024 : उत्तर महाराष्ट्रावर राजकीय अर्थानं वर्चस्व मिळवायचं असेल तर नाशिक ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे.. मात्र याच नाशिकमधला महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए.. आता तर भुजबळांमुळे नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट आलाय.
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं आणि आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अजूनही महायुतीत (Mahayuti) काही जागांचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीए. यापैकी सर्वात मोठी डोकेदुखी ठरलीय ती नाशिक लोकसभा मतदारसंघाची (Nashik Loksabha Constituency). नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नाहीए. आता या जागेवरुन महायुतीत पुन्हा एकदा ट्विस्ट आलंय. नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलंय.
शिवसेना-राष्ट्रवादीत रस्सीखेच
नाशिकच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते इच्छुक आहेत. सुरुवातीला छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. पण भुजबळांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र आता भुजबळांनी पुन्हा राष्ट्रवादीचा दावा सांगितलाय. त्यातच नाशिकची जागा छगन भुजबळांनी लढवावी असा ठराव समता परिषद, ओबीसी संघटनांनी केलाय. तर भुजबळांनी घ्याव्या लागलेल्या माघारीचे पडसाद माळी समाजातही उमटतायत.
माघारीचा निर्णय भुजबळ बदलणार?
1992 साली भुजबळांनी समता परिषदेची स्थापना केली. भुजबळांची माळी आणि ओबीसी समाजात मोठी ताकद आहे. दिल्ली, बिहार, राजस्थान, गोवा, मध्यप्रदेश राज्यात भुजबळांना मानणारा वर्ग आहे. दिल्लीचं रामलीला मैदान, जयपूर, पाटणामध्ये भुजबळांनी ओबीसींची महारॅली घेतली होती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आपल्याला उमेदवारी दिल्याचा पुन्हा एकदा उल्लेख भुजबळांनी केलाय. केंद्रीय नेत्यांना आपली गरज होती, त्यांनीच आपलं नाव सुचविल्याचं भुजबळ वेळोवेळी सांगतायत.. तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावाही सांगतायत. आता समता परिषद, ओबीसी संघटना, माळी समाजाच्या आग्रहाखातर भुजबळ नाशिकमधून माघारी घेण्याचा आपला निर्णय बदलणार का? भुजबळ नाशिकमधून लढणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मुंबईच्या तीन जागांवरुन महायुतीत वाद
मुंबईतील महायुतीच्या 3 जागांचा तिढा कायम आहे. मात्र, दोन जागांवर उमेदवार निश्चित झाल्याची माहिती मिळतेय. सोमवारी ठाण्यात रवींद्र वायकर आणि यशवंत जाधवांची पत्नी यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांसोबत उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र वायकर इच्छुक नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून त्याची मनधरणी सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यामुळे उत्तर पश्चिम जागेसाठी रवींद्र वायकर यांच्या रूपाने नवीन चेहरा उमेदवार म्हणून मिळण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला शिंदे पक्षाचे यशवंत जाधव इच्छुक आहेत. दरम्यान यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय...