`आम्ही जेव्हा ऑपरेशन करतो ना, तेव्हा...`, अंबादास दानवेंचा उल्लेख करत फडणवीसांनी सांगितली भाजपाची रणनीती
LokSabha: उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना ऊत आला असताना देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अंबादास दानवे आपल्या संपर्कात नसल्याचं सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
LokSabha: उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगल्या असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केलं आहे. अंबादास दानवे आपल्या संपर्कात नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसंच ज्यांना तुम्ही संशयाच्या फेऱ्यात उभे करत आहात त्यांच्यातील कोणीही नाही असं सांगत त्यांनी सर्व अपेक्षित नावं फेटाळून लावली आहेत. माजी मंत्री, काँग्रेस नेते शिवराज चाकूरकर यांच्या सून अर्चना चाकूरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना मराठवाड्यातील मोठा नेता प्रवेश कऱणार आहे का? असं विचारला असता त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, "मराठवाड्यातील मोठ्या नेत्याने प्रवेश केला. दुसरा कोणताही नेता प्रवेश करेल अशी कोणतीही स्थिती नाही. तुम्ही अंबादास दानवे यांच्याबद्दल बोलत आहात. पण आम्ही जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा तुम्हाला कळत नाही. आणि जर ते तुम्हाला कळतं ते ऑपरेशन नसतं".
"अंबादास दानवेंशी आमचा कोणताही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्यात कोणतीही चर्चा नाही", असं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. निवडणुकीदरम्यान प्रवेश, भुकंप होत असतात. आज तरी असं कोणीच नाही. ज्यांना तुम्ही संशयाच्या फेऱ्यात उभे करत आहात त्यांच्यातील कोणीही नाही असं फडणवीस म्हणाले आहेत.
"अमित देशमुख माझ्या संपर्कात नाहीत. त्यांच्या भाजपा प्रवेशाची कोणतीही चर्चा नाही. विरोधक असले तरी उगाच त्यांना संशयाच्या फेऱ्यात उभं करु नये," असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. भाजपात एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त करता येतात. पण सगळे एकत्र काम करत असतात. मराठवाड्यात आम्ही रेकॉर्डब्रेक विजयाची नोंद करु असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
'महायुतीत 4 ते 5 जागांवरुन अडलं आहे'
दरम्यान महायुतीत 4 ते 5 जागांवरुन अडलं असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. "एक जागा अडली की 3 जागा अडतात. आता आमच्या जागा घोषित झाल्या आहेत. राष्ट्रवादीही लवकरच करणार आहे. फार अडलं आहे अशी स्थिती नाही. थोडंसं अडलं असून एक ते दोन दिवसात मिटवू," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
अंबादास दानवेंही चर्चा फेटाळल्या
दुसरीकडे अंबादास दानवे यांनीही पत्रकार परिषद घेत भाजपात प्रवेश कऱण्याच्या चर्चा निराधार असल्याचं म्हटलं आहे. "मला या सगळ्या गोष्टी करायच्या असत्या तर मी आधीच केल्या असत्या. माझ्या मनात कोणताही विषय नाही. त्यामुळे एखादी निवडणूक येणे मी महत्त्वाचे मानत नाही. या बातम्या माझ्या 30 वर्षांच्या निष्ठेने काम करण्याचा अपमान करणाऱ्या आहेत. नाराज असलो म्हणून काय झालो? भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षे युती होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे विचार एक होतो. मी त्यांच्यासोबत होतो म्हणून मी भाजपमध्ये गेलो का?," असा सवाल अंबादास दानवेंनी केला.