लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने त्यांना वेळीच उपस्थितांनी पकडल्याने ते खाली पडले नाहीत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार राजश्री पाटील (Rajashree Patil) यांच्या प्रचारार्थ पुसद येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषण करत असताना त्यांना भोवळ आली. यानंतर उपस्थितांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी नेलं. दरम्यान नितीन गडकरी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रकृतीची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी यांना भोवळ आल्यानंतर सभास्थळी एकच धावपळ सुरु झाली आहे. मंचावर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना वेळीच डॉक्टरांकडे उपचारासाठी नेलं. नितीन गडकरी यांनी काही वेळातच पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली होती. यादरम्यान त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपण पुढील सभेसाठी जात असून, प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती दिली. 


नितीन गडकरी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "पुसद, महाराष्ट्रा येथे प्रचारादरम्यान उकाड्यामुळे अस्वस्थ वाटलं. पण आता पूर्णपणे तंदरुस्त आहे आणि पुढील सभेत सहभागी होण्यासाठी वरुडला जात आहे. तुमचं प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद".



ममता बॅनर्जींनी 7 टप्प्यातील मतदानावर केली टीका


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत तापमानाचा पार वाढलेला असताना 7 टप्प्यात होणाऱ्या मतदानावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. "ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी पूर्णपणे आणि लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा. या कडक उन्हाळ्यात निवडणूक लढवणे खरोखरच असह्य आहे. आज 24 एप्रिल आहे, आणि तुम्ही कल्पना करू शकता का,7 टप्प्यातील निवडणुका 1 जूनपर्यंत चालू राहतील?", असं त्या म्हणाल्या आहेत. 



नितीन गडकरीही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून ते भाजपाचे उमेदवार आहेत. नागपुरात पहिल्या टप्प्यात मतदान झालं आहे. येथे नितीन गडकरींसमोर काँग्रेसचे विकास ठाकरे यांचं आव्हान आहे. 


दरम्यान नितीन गडकरी यांची याआधीही अशाप्रकारे प्रकृती बिघडली होती. 2018 मध्ये अहमदनगर येथील कार्यक्रमात ते अचानक बेशुद्ध पडले होते. यावेळी तत्कालीन राज्यपाल विद्यासागर रावही त्यांच्यासह उपस्थित होते. राज्यपालांनी मंचावरच त्यांना सांभाळलं होतं. साखरेची पातळी कमी झाल्याने भोवळ आल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. त्यांना पाणी पाजण्यात आलं होतं आणि पेढा भरवण्यात आला होता. तसंच त्याआधी एकदाही गडकरींची प्रकृती बिघडली होती.