दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेने माढासह राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. एकीकडे शिवसेना-भाजपाची युती झाली असताना दुसरीकडे स्वाभीमानी शेतकरी संघटनेने स्वबळावर निवडणूक लढवली माढ्यात शरद पवारांसह अनेक मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर आव्हान उभं राहू शकतं. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर सध्या राज्यभर फिरून या मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भाजपाविरोधी सर्व पक्षांची मोट बांधण्याच्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या उद्देशावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. आता राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनाही स्वबळाच्या मार्गावर आहे. राजू शेट्टी यांनी महाआघाडीत हातकणंगले, बुलढाणा, वर्धा आणि अमरावती या चार जागांची मागणी केली आहे. यातील केवळ हातकणंगलेची जागा देण्याची तयारी आतापर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादीने केली आहे. उरलेल्या जागांबाबत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेने लोकसभेच्या नऊ जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यात माढासह, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, शिर्डी, बुलढाणा, वर्धा, धुळे, नंदुरबार या मतदारसंघांचा समावेश आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर सध्या राज्यभर फिरून या मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी करत आहेत.
 हातकणंगलेतून स्वतः राजू शेट्टी, बुलढाण्यातून प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, वर्ध्यातून माजी मंत्री सुबोध मोहीत हे उमेदवार निश्चित आहे. याशिवाय इतर मतदारसंघासाठी काही माजी सनदी अधििकारी आणि इतर पक्षातील बंडखोर स्वाभीमानच्या संपर्कात आहेत.



स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या या भूमिकेमुळे माढ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर स्वाभीमानी मतांची विभागणी करून आव्हान उभं करू शकते. सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रात ताकद असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा मागील चार वर्षात राज्यात विस्तार झाला आहे. त्यामुळे राज्यभरात स्वाभीमानी शेतकरी संघटना काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी धोक्याची ठरू शकते. ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये विद्यमान सरकारविरोधात काही प्रमाणात रोष आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र निवडणूक लढवली तर नाराज शेतकर्‍यांची मतं त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. या मतविभागणीचा फायदा शिवसेना - भाजपाला होण्याची शक्यता आहे.