इंदापूर : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी देशभरात सुरू आहे. सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांची आयात निर्यात सुरू आहे. युती- आघाडीची समीकरणे जुळली असली तर प्रत्यक्षातील हेवेदावे दूर होण्यास वेळ लागणार आहे. सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यातूनच जात आहे. काहीही करुन भाजपाला मात द्यायचीच या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. ही वेळ आपआपसात भांडण्याची नसून भाजपा-सेनेची सत्ता उलथण्याची असल्याचे उद्दीष्ट यांच्यासमोर आहे. प्रचारात एकमेकांना सहकार्य करण्याच्या हेतूने ही भेट होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज्यभरात भाजपा-शिवसेनेच्या प्रचार सभा जोरात सुरु आहेत. एकमेकांविरोधात वक्तव्य करणारे दोन पक्ष आज हिंदुत्वाच्या नावाखाली मतं मागत आहेत. अशावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही प्रत्यक्षात एकत्र येण्याची गरज वाटू लागली आहे. इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्ते सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सहभागी व्हायला तयार नाहीत. त्यामुळे संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी हर्षवर्धन पाटलांची मनधरणी अजित पवारांकडून केली जात आहे. खरं तर या दोघामंध्ये कमालीचं वितुष्ट आहे.



 त्यात गेल्या विधानसभेला इंदापुरातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. आणि हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला होता. त्याची सल हर्षवर्धन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. यावेळी देखील विधानसभेसाठी राष्ट्रवादी सहकार्य करणार का ? यावर हर्षवर्धन पाटलांचं भवितव्य अवलंबून आहे.  त्यामुळे लोकसभेला सुप्रिया सुळेंची कोंडी करण्याची नीती हर्षवर्धन समर्थकांकडून अवलंबली जात आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांना हर्षवर्धन पाटलांचा उंबरा चढावा लागलाय. त्यात त्यांचं मनोमिलन होतं का पाहावं लागेल.