गिरीश बापट यांची खासदारकीची संधी यंदाही हुकली?
पुण्यात सध्या पालकमंत्री गिरीश बापट यांचा लोकसभा निवडणुकीतून पत्ता कापला गेल्याची चर्चा आहे.
अरुण मेहेत्रे, पुणे : पुण्यात सध्या पालकमंत्री गिरीश बापट यांचा लोकसभा निवडणुकीतून पत्ता कापला गेल्याची चर्चा आहे. पण बापटांची तयारी मात्र जोरात सुरु आहे. पालकाच्या भूमिकेत असलेल्या पालकमंत्र्यांनी एक समारंभ आयोजित केला होता. गिरीश बापटांनी पुण्यातल्या नगरसेवकांसाठी खास स्नेहमिलन ठेवलं होतं. स्न्हेभोजन हे ओघानं आलच. महापालिकेतल्या भाजप, शिवसेनेसह रिपाइं मिळून नव्वद नगरसेवकांनी बापटांच्या आमंत्रणाचा मान ठेवला. भाजपपासून दुरावलेले राज्यसभा खासदार संजय काकडे यांचे समर्थकही यावेळी उपस्थित होते हे विशेष. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गिरीश बापटांनी हा घाट घातला. यावेळी तरी खासदार व्हायला मिळावं अशी बापटांची मनोमन इच्छा आहे. याविषयी ते काहीही सांगत असले तरी तो ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा प्रकार म्हणावा लागेल.
गिरीश बापटांची युतीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्ह्णून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे यावेळीदेखील त्यांची संधी हुकणार असल्याची चर्चा आहे. पण ही पक्षाची इच्छा म्हणत त्यांनी पक्षशिस्तीची टिमकीही वाजवली आहे.
गिरीश बापट हे राजकारणातले कसलेले पैलवान आहेत. त्यामुळे त्यांच्या पद्धतीनं त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. खरंतर पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे पुन्हा एकदा खासदार होण्याचा मनसुबा बाळगून आहेत. भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले हे देखील उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा परिस्थितीत सर्वार्थानं ज्येष्ठ असलेल्या गिरीश बापटांच्या हालचाली लक्षवेधी ठरत आहेत.