औरंगाबाद : सर्वच प्रमुख पक्षांची उमेदवारी आता जाहीर झाली. त्यामुळे औरंगाबादेत यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पाचव्यांदा लोकसभेसाठी नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी खैरे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवातही केली आहे. आतापर्यंत शिवसेनेची लढत ही काँग्रेससोबतच झाली. मात्र यावेळी वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून एमआयएमसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एमआयएमचे शहरात २८ नगरसेवक आहेत, त्यातच गेल्या काही वर्षात जलील यांनीही औरंगाबादेत स्वतःचे प्रस्थ निर्माण केले आहे. औरंगाबादमध्ये जवळपास पावणेचार लाख मुस्लिमांची मते तर दलितांची मते अडीच लाखांहून अधिक आहेत. त्यामुळे जलील यांची भिस्त या मतदारांवरच आहे. यासोबत औरंगाबादकरांवरही जलील यांचा विश्वास आहे.


एमआयएमला कमी लेखणार नसल्याचे सांगत विकासकामांच्या जोरावर आपणच जिंकणार असा दावा खैरेंनी केला आहे. काँग्रेसकडून सुभाष झांबड निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र सत्तारांच्या बंडखोरीमुळे काँग्रेससाठी ही निवडणूक बिकट झालीय. त्यातच एमआयएम रिंगणात उतरल्याने काँग्रेसच्या परंपरागत मतांचं विभाजन होणार आहे. याचा फायदा खैरेंना होणार की एमआयएम बाजी मारणार याकडं नजरा लागल्या आहेत.