नितीन गडकरींचा अर्ज दाखल, रथावर स्वार होत जोरदार शक्तीप्रदर्शन
जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नितीन गडकरींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय
नागपूर : नागपूरचे 'विकास पुरुष' म्हणून ओळखले जाणाऱ्या नितीन गडकरी यांनी आज लोकसभा निवडणूक २०१९ साठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नितीन गडकरी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे नेते आणि स्टार प्रचारक नितीन गडकरी यांच्यासोबत अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच शिवसेना नेते आणि रामटेकचे उमेदवार कृपाल तुमाने हेही उपस्थित आहेत. याआधी नितीन गडकरी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
सकाळीच नागपूरमधून नितीन गडकरी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गडकरींच्या या शक्तिप्रदर्शन रॅलीसाठी खास इसुझू गाडीचा एक रथ तयार करण्यात आला आहे. या रथातून गडकरींनी मिरवणूक काढत अर्ज दाखल करण्यासाठी कूच केली. गडकरींच्या सौभाग्यवतींनी गडकरी, मुख्यमंत्री आणि उर्जामंत्री यांचं औक्षण केलं. त्यानंतर गडकरींनी घरातल्या देव्हाऱ्यातल्या रेणुका मातेचं दर्शन घेतलं. घरातून निघाल्यावर कार्यकर्त्यांसह गडकरी संविधान चौकात दाखल झाले. संविधान चौकात गडकरींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सुरू झाली शक्तिप्रदर्शन करणारी रथयात्रा.... यासाठी खास तयार करण्यात आलेल्या रथावर स्वतः गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आरूढ झाले आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही रॅली सुरू झाली. त्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांसह गडकरी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले.
यापूर्वी, बंजारा समाजाच्यावतीने नागपुरात बंजारा समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात गडकरींनी आपली रोखठोक मतं मांडली. 'विकास कामांबाबत आपण जे बोलतो करून दाखवतो' असा दावाही त्यांनी या कार्यक्रमात केला.