वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. 'पराभव दिसत असल्यामुळंच शरद पवारांनी लोकसभा निवडणूक २०१९ मधून माघार घेतली'  असं मोदींनी म्हटलंय. पवारांच्या हातातून पक्ष निसटत चालला असून पवार घराण्यात गृहकलह होत असल्याचा सनसनाटी आरोप मोदींनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्ध्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. स्वावलंबी शाळेच्या मैदानावर पंतप्रधानांची ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली. लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील ही पहिलीच प्रचार सभा ठरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी १८ एकर मैदानात ५० हजार खुर्चा लावण्यात आल्या. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पंतप्रधानांनी मराठीतून ट्विट केलंय. केंद्र आणि राज्य सरकारनं केलेल्या लोकाभिमुख कामांच्या जोरावर महाराष्ट्रात महायुतीला जनतेचा भक्कम आशीर्वाद मिळेल असा विश्वास मोदींनी ट्विटद्वारे व्यक्त केलाय.  


'महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना नमस्कार! आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई(आ) महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे!' असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.  


या सभेसाठी नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी, चंद्रपूरचे हंसराज अहिर, रामटेकचे कृपाल तुमाणे, वर्ध्याचे रामदास तडस, गडचिरोलीचे अशोक नेते, यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी, अमरावतीचे आनंद अडसूळ, अकोल्याचे संजय धोत्रे, भंडारा-गोंदियाचे सुनील मेंढे, बुलढाण्याचे प्रताप जाधव हे विदर्भातील युतीचे दहा उमेदवार सभेला उपस्थित राहिले.


तसंच या सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील हजर राहिले.


उल्लेखनीय म्हणजे, गेल्या लोकसभा निवडणुकीतही मोदींनी प्रचाराचा नारळ वर्ध्यामध्येच फो़डला होता. ३ एप्रिलला पंतप्रधान गोंदियात सभा घेणार आहेत. विदर्भातल्या ७ जागांवर येत्या ११ एप्रिलला मतदान होत आहे.