मुंबई : सोमवारी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत चर्चांणा पूर्णविराम दिला. ते माढा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली होती. 'एकाच घरातील दोघे जण आधीच निवडणूक लढवत आहेत, त्यात आता तिसरा नको... त्यामुळे मी स्वत: निवडणुकीला उभे न राहता नव्या पिढीतील उमेदवारांना संधी देणार' असल्याचं सांगत शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यावर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मात्र आपली नाराजी जाहिरपणे व्यक्त केलीय. 'कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा विचार करून निर्णय बदलावा' असं आवाहन नातू रोहित पवार यांनी फेसबुकद्वारे आजोबांना केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित हा पवारांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांचा नातू आहे. नुकत्याच झालेल्या शरद पवारांच्या कोकण दौऱ्यात अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि युगेंद्र श्रीनिवास पवार यांच्यासोबत रोहितदेखील सहभागी झाले होते.


जाणून घ्या, पवार आजोबांसोबत फिरणाऱ्या 'घड्याळाच्या नव्या काट्यां'बद्दल...



काय म्हटलंय रोहित पवार यांनी...


'राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे. पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली ५२ वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणातदेखील हीच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते, असं सर्वसामान्य माणसाचं मत आहे.


महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाच, जातीधर्माचं राजकारण न करता गेली ५२ वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे. म्हणूनच पवार साहेबांचं राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं.


एक कार्यकर्ता म्हणून...


साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाचं हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा. 


बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलचं आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसंही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल...


असं रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यासाठी जागा सोडली हे काही रोहित पवार यांना पटलेलं नाही, अशा आशयाची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगलीय.