LoksabhaElection2019 : पवार कौटुंबिक कलहाच्या डोहात?
पवारांसारखा मुरलेला राजकारणी अचानक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार का घेतो?
अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेत लोकसभा निवडणूक २०१९ न लढण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केलं. पण, लोकसभा निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाप्रत पवार का आले? आधी शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची भीष्मप्रतिज्ञा केली... मग स्वतःचीच भीष्मप्रतिज्ञा मोडीत काढली... आता पुन्हा एकदा निवडणूक लढवणार नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. यापूर्वी, पार्थ पवार निवडणूक लढवणार नाहीत, असंही त्यांनी जाहीर केलं होतं. पण आता पार्थ अजित पवार यांच्याच उमेदवारीची घोषणा करण्याची वेळ पवारांवर आलीय. तर दुसरीकडे पवारांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांचा नातू रोहित पवार यांनी 'कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा विचार करून निर्णय बदलावा' असं आवाहन सोशल मीडियावरून आपल्या आजोबांना केलंय.
अधिक वाचा :- निवडणूक न लढण्याचा निर्णय बदलावा, रोहित पवारांचं आजोबांना आर्जव
पवारांच्या घरात कौटुंबिक कलह?
शरद पवारांना नक्की झालंय तरी काय? शरद पवार म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात माहीर असलेले आणि पाडापाडीच्या राजकारणात तरबेज असलेले जाणते राजे... पण पवारांसारखा मुरलेला राजकारणी अचानक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार का घेतो? असा सवाल अनेकांना पडलाय. पराभवाच्या भीतीमुळं नाही, तर पवार कुटुंबातील तीन व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात नको, म्हणून माघार घेत असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. असं असेल तर शरद पवारांच्या घरात कौटुंबिक कलह सुरू झालाय की काय? अशी शंका घेतली जातेय... कारण पार्थ उमेदवार नसतील असं पवारांनी जाहीर केल्यानंतरही ना अजित पवारांनी मावळमधील दौरे थांबवले.... ना पार्थ पवारांनी जनसंपर्क मोहीम गुंडाळली... उलट पार्थची उमेदवारी अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली.
पवारांचा 'शब्द पलटतोय'
गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवारांनी मावळचा कोपरा अन् कोपरा पिंजून काढलाय. एकीकडं आर. आर. आबांची कन्या स्मिता पाटील हिच्यासाठी सुप्रिया सुळेंनी शब्द टाकला होता. तर दुसरीकडं सुनील तटकरेंपासून शेकापच्या जयंत पाटलांपर्यंत सर्वांनीच पार्थच्या उमेदवारीचा आग्रह धरला. नव्हे, तसा दबावच शरद पवारांवर आणण्याचा प्रयत्न केला.
जाणून घ्या, पवार आजोबांसोबत फिरणाऱ्या 'घड्याळाच्या नव्या काट्यां'बद्दल...
केवळ माढा आणि पार्थ पवारांच्या उमेदवारीवरूनच नव्हे, तर अहमदनगरच्या जागेवरूनही शरद पवारांना कोलांटीउडी मारावी लागली. आधी नगरची जागा काँग्रेसला सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असा निर्णय झालेला नसल्याचं सांगितल्यानंतर पवारांनाही तसा खुलासा करावा लागला.
राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांचा शब्द हा अंतिम शब्द मानला जातो. पण सध्या राष्ट्रवादीच्या घडाळ्याला नेमकं कोण चावी देतंय? हे जाणकारांच्या लक्षात येईल. पवारांनी माढातून माघार घेताना नव्या पिढीच्या हाती सूत्रं देण्याचं सूतोवाच केलंय. देशाच्या सत्ताकारणात आता पवारांची भूमिका काय असेल, याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलंय.