दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील माढा हा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. मोहिते-पाटील घराण्याने धरलेली भाजपाची वाट, भाजपाच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष झालेले संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीकडून मिळालेली उमेदवारी यामुळे माढ्यातील लढत रंगतदार ठरणार आहे. मागील काही दिवस माढ्यातील राजकारण हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे. राष्ट्रवादीने संजय मामा शिंदे यांना प्रवेश देऊन माढ्याची उमेदवारी दिल्याने माढ्यातील निवडणूक रंगतदार ठरणार आहे. शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात माढा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला. त्यानंतर पवार घराण्यातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात नको हे सांगत शरद पवारांनी माघारही घेतली. माघार घेताना विजयसिंह मोहिते-पाटील यांनी निवडणूक लढवावी असेही पवारांनी जाहीर केली. मात्र विजयसिंह मोहिते-पाटील यांनी रणजितसिंह यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला आणि माढ्यातील राजकारणच बदलले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीला माढ्यातील स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला. यामागचे कारण म्हणजे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या साखर कारखान्याने पैसे थकवल्याने त्यांच्याबद्दल माढ्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. हे सगळं राजकारण सुरू असताना प्रभाकर देशमुख यांनी माढ्यात कामाला सुरुवात केली होती, मात्र त्याचवेळी शरद पवार हे संजयमामा शिंदे यांचं जाहीर कार्यक्रमातून कौतुक करत होते. संजय शिंदे हे भाजपाच्या मदतीने सोलापूर जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी बसले असून ते राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू आहेत. राष्ट्रवादीची ही खेळी सुरू असताना तिकडे मोहिते-पाटील भाजपाच्या संपर्कात होते. 


विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीशी संपर्क तोडला आणि दोन दिवसात रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सुंटी वाचून खोकला गेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी होती. मोहिते पाटील स्वतः दूर झाल्यानं संजय शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले. भाजपानेही संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही. 


संजय शिंदे आता राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरणार असल्याने आता माढाची निवडणूक रंगणार आहे. सोलापूरात समविचारी आघाडी असून त्यात माढा-करमाळाचे संजय शिंदे यांच्यासह माळशिरसचे उत्तम जानकर, सांगोलाचे शहाजी पाटील, माणचे जयकुमार गोरे, फलटणचे रणजितसिंह निंबाळकर यांचा समावेश आहे. या सगळ्यांची मदत संजय शिंदे यांना होण्याची शक्यता असून याशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद आणि मोहिते-पाटील यांच्याविरोधातील गट संजय शिंदेच्या पाठिशी असणार आहे. त्यामुळे माढ्यातील लढत चुरशीच्या लढतीपैकी एक असणार आहे.