Ajit Pawar Not Reachable: बारामती मतदारसंघातील मतदान 13 मे रोजी पार पडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे आहेत यासंदर्भात समर्थकांना प्रश्न पडला आहे. बारामतीमधील मतदानाआधी अगदी दररोज प्रसारमाध्यमांबरोबर संवाद साधणारे आणि प्रचारसभांना हजेरी लावणारा अजित पवार अचानक नॉट रिचेलब झाले आहेत. त्यामुळेच समर्थकांबरोबरच विरोधकांकडूनही अजित पवारांच्या ठावठिकाण्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मात्र या दौऱ्यातील कोणत्याही कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहिले नाहीत. आता अजित पवार कुठे आहेत यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यांचे चुलते आणि राजकीय विरोधक शरद पवार यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे.


अजित पवार मोदींच्या कार्यक्रमांपासून दूर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींच्या बुधवारच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते. अजित पवारही मोदींच्या सुरुवातीच्या काही दौऱ्यांदरम्यान सभांना हजर होते. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी त्यांचं लक्ष बारामतीमधील प्रचारावर केंद्रित केल्याचं दिसलं. बुधवारी दिंडोरीतील सभेमध्ये अजित पवारांऐवजी छगन भुजबळ उपस्थित होते तर कल्याणमधील सभेला सुनील तटकरेंनी हजेरी लावली. मात्र अजित पवार या सभांनाही दिसेल नाहीत किंवा घाटकोपरमधील रोड शोमध्येही सहभागी झाले नाहीत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून उमेवदारी अर्ज भरताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. इथेही अजित पवारांऐवजी प्रफुल्ल पटेलांनीच उपस्थिती लावली. 


वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दावे...


अजित पवारांच्या प्रसारमाध्यम समन्वय करणाऱ्या टीमने अजित पवार दोन दिवसांपासून कुटुंबीयांसोबत बाहेर आहेत. नेमके कुठे आहेत माहिती नाही, असं सांगितलं आहे. अजित पवारांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी अजित पवार यांना घशाचं इन्फेक्शन झालं आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. शरद पवार यांना अजित पवारांसंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी, "अजित पवार खरंच आजारी आहेत," असं उत्तर दिलं. 


भाजपा विरुद्ध अजित पवार


अजित पवारांनी बारामतीमधील कमी मतदानासाठी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवलं होतं. चंद्रकांत पाटलांनी बारामतीमधील सभेमध्ये 'शरद पवार यांना आम्हाला संपवायचं आहे' असं विधान केलं होतं. या विधानावरुन अजित पवारांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पुण्यातील भाजपा कार्यकर्ते अजित पवारांवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.


'अजित पवारांना घशाचं इन्फेक्शन'


“अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले होते, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे. मात्र ते उद्यापासून पुन्हा प्रचारात सहभागी होतील”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.