Loksabha Election 2024 Baramati Constituency: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघांच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर 2023 साली मे महिन्यामध्ये सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्री पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नणंद-भावजय लढाईत कुणाला कौल मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. मात्र आता या ठिकाणची लढाई भाऊ विरुद्ध बहिणीत होणार की काय अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. यामागील कारण म्हणजे अजित पवारांच्या नावानेही बारामतीमधून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  


अजित पवारांच्या नावेही घेण्यात आला अर्ज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामतीमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढत असलेल्या सुनेत्रा पवार 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून त्यांच्या नावे अर्ज घेण्यात आला आहे. मात्र त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नावे देखील अर्ज घेण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार हे 'डमी उमेदवार' असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा अर्ज काही कारणानं बाद ठरल्यास उमेदवारी बाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशावेळी पर्यायी उमेदवार म्हणून खुद्द अजित पवार यांचा अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे. बारामतीमधील निवडणूक ही अजित पवार आणि शरद पवार गटाने प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी बाबत महायुतीकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचं या उमेदवारी अर्जासंदर्भातील घडामोडीवरुन स्पष्ट होत आहे.


डमी उमेदवार म्हणजे काय?


सामान्यपणे महत्त्वाच्या जागांवर उमेदवारी अर्ज भरताना राजकीय पक्ष खबरदारीचा उपाय म्हणून डमी उमेदवारी अर्जही भरुन ठेवतात. काही कारणाने मुख्य उमेदवाराचा अर्ज पडताळणीदरम्यान रद्द झाला तर सदर जागेवर उमेदवारच नाही अशी नामुष्की ओढवू नये या हेतूने डमी उमेदवाराचा अर्ज भरला जातो. सामान्यपणे प्रतिष्ठेची लढाई असणाऱ्या निवडणुकांमध्ये डमी उमेदवार वापरला जातो. मात्र डमी उमेदवार निवडताना तो मुख्य उमेदवाराच्या तोलामोलाचा आणि गरज पडल्यास त्यालाच निवडणूक लढवावी लागली तर निवडून येण्याची खात्री असलेला असावा अशी खबरदारी घेतली जाते. तसाच प्रकार सध्या बारामतीमध्ये दिसून येत आहे.