`बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस`, `मध्यरात्रीनंतरही बँक सुरु`; कारमध्ये 500 च्या नोटा
Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामतीमधील मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारसंघामध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत हा सारा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. काल रात्री बारामतीमध्ये बँक मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही सुरु होती असा दावा करणारा एक व्हिडीओही रोहित पवारांनी पोस्ट केला आहे. त्याचप्रमाणे कारमधून पैशांचा वाटप केलं जात होतं हे दाखवणारे काही व्हिडीओ त्यांनी पोस्ट केले आहेत. या प्रकरणामध्ये रोहित पवार यांनी थेट अजित पवार गटाचा हात असल्याचा उल्लेख आपल्या पोस्टमध्ये केला आहे. 'रात्री बारामतीत पैशांचा पाऊस पडला' असा उल्लेखही या पोस्टमध्ये आहे.
मध्यरात्रीनंतर बँक सुरु
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत असून यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ! इथे अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्यादरम्यान लढत आहे. दोन्हीकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आलेली असतानाच मतदानाला सुरुवात होण्याच्या काही तास आधी बारामतीत अगदी बँक मध्यरात्रीनंतर सुरु ठेवत पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
बँकेचा ओव्हर टाइम असावा असा टोला
"पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय. आत्ता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा," अशा खोचक कॅप्शनसहीत रोहित पवार यांनी या बँकेची शाखा रात्रीही सुरु होती असा दावा करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी, "निवडणूक आयोग दिसतंय ना?" असा सवालही विचारला आहे. "सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल," असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस
"बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस.." असं म्हणत रोहित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये कारमध्ये 500 च्या नोटा पडल्याचं दिसत आहे. तसेच या कारमध्ये घड्याळ चिन्ह असलेलं निवडणूक प्रचाराचं साहित्यही दिसत आहे. हा व्हिडीओ बारामती मतदारसंघातील भोर तालुक्यातील असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. "यामध्ये भोर तालुक्यातील 'अजितदादा मित्रमंडळा'चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसत आहे," असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
यासाठी हवी होती का व्हाय दर्जा सुरक्षा?
"याचसाठी व्हाय दर्जाची सुरक्षा हवी होता का?" असा सवालही रोहित पवारांनी विचारला आहे.
कारमध्ये 500 च्या नोटा अन् पक्षाचं प्रचार साहित्य
"विचारांची कास सोडलेल्यांना दिवसा सामान्य लोकांची कामं करता येत नाहीत. मात्र बारामती मतदारसंघात निवडून येण्यासाठी रात्रभर जे ‘उद्योग’ सुरू आहेत त्याचे हे व्हिडीओ," असं म्हणत रोहित पवारांनी कथित पैसे वाटपाचे व्हिडी शेअर केले आहेत. तसेच रोहित पवार यांनी पैसेवाटप करण्याचा प्रयत्न झाला, "तरीही स्वाभिमानी मतदार विकला जाणार नाही," असंही म्हटलं आहे. "अपेक्षा आहे निवडणूक आयोग झोपेत नसेल आणि यावर कायदेशीर कारवाई होईल," असंही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या प्रकरणावर अद्याप अजित पवार गटाने कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. मात्र या प्रकरणावरुन राजकारण तापण्याची चिन्हं दिसत आहेत.