Loksabha Election 2024 Big Shock To Sharad Pawar Group: साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. साताऱ्यातील संभाव्य उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुक लढवण्यास नकार दिला आहे. श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि जवळचे मित्र आहेत. उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या जागी श्रीनिवास पाटील जिंकून आले होते. यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळेल असं निश्चित मानलं जात होतं. मात्र त्यांनी अचानक माघार घेतल्याने आता शरद पवार गटाचा साताऱ्यातून उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.


श्रीनिवास पाटील नाही तर कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

83 वर्षीय श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तब्बेत बरी नसल्याने आपण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक नाही असं श्रीनिवास पाटील यांनी कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रीनिवास पाटील यांनी मनधरणी केली जाईल असं बोललं जात आहे. मात्र त्यानंतरही श्रीनिवास पाटील यांचा नकार कायम राहिला तर शशिकांत शिंदे किंवा बाळासाहेब पाटील यांना शरद पवार गटातून साताऱ्यामधून उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. श्रीनिवास पाटलांना उमेदवारी दिल्यास साताऱ्यात पुन्हा शरद पवार गटाचाच खासदार असेल असा दावा येथील पक्ष कार्यकर्त्यांकडून केला जात होता. मात्र आता श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्याने शरद पवार गटासमोरील अडचणी वाढणार आहेत हे निश्चित.


पवारांच्या शब्दावर सनदी अधिकारी पद सोडलं अन्...


विद्यमान खासदार असलेल्या श्रीनिवास पाटील यांची राजकीय वाटचाल फारच रंकज राहिली आहे. सनदी अधिकारी म्हणून कारकिर्दीस सुरुवात करणारे श्रीनिवास पाटील यांनी खासदारकीपासून राज्यपाल पदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या. त्यानंतर उदयनराजे भोसलेंनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळेस जिवलग मित्र असलेल्या शरद पवारांच्या मदतीसाठी श्रीनिवास पाटीलच धावून आले. सर्वात आधी शरद पवारांच्या शब्दाखातरच श्रीनिवास पाटलांनी सनदी अधिकारीपदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला होता. श्रीनिवास पाटील हे कराड लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार झाले. त्यानंतर त्यांनी सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं होतं.


राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 20 दिवसांमध्ये सोडली नोकरी


शरद पवार 10 जून 1999 रोजी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर अवघ्या 20 दिवसांमध्ये म्हणजेच 30 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झालेल्या शरद पवारांच्या सांगण्यानुसार श्रीनिवास पाटीलांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ऑक्टोबर 1999 च्या लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि कराड मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडूण झाले. 2004 साली ते दुसऱ्यांदा कराड मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेत गेले. 2004 मध्ये महाराष्ट्रातील सर्व खासदारांपैकी सर्वाधिक मताधिक्याने जिंकून जाणारे ते दुसऱ्या क्रमांकाचे खासदार ठरले होते. 2013 मध्ये भाजपची सत्ता असतानाही ते सिक्कीमचे राज्यपाल झाले. राज्यपालपदाच्या कार्यकाळामध्ये श्रीनिवास पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. 2019 मध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवत तिसऱ्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला.


पवारांची पावसातील सभा त्यांच्यासाठीच


शरद पवार पवासात भिजलेली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही चर्चेत असलेली पावसातील सभा ही श्रीनिवास पाटलांसाठीच घेतलेली. त्यामुळेच आता पुन्हा एकदा शरद पवारांनी शब्द टाकल्यास श्रीनिवास पाटील आपला निर्णय बदलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.