भाजपची राज्यातील तिसरी यादी जाहीर, अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी
नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या तातडीने नागपूरला रवाना झाल्या आहेत. त्या आजच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे.
Bjp Navneet Rana Amravati constituency : लोकसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं आहे. देशभरात येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. आता महायुतीकडून अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. सध्याच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपने अमरावती मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अमरावतीत भाजपकडून नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे यांची लढत होणार आहे.
भाजपकडून नुकतंच सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एक नाव पाहायला मिळत आहे. यात अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा यांना भाजपने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून नवनीत राणा लढणार याबद्दलच्या चर्चा पाहायला मिळत होत्या. पण त्यांच्या नावाला शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सातत्याने विरोध होत होता. तसेच बच्चू कडूंनीही नवनीत राणांच्या नावाला विरोध केला होता. पण तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याबद्दल सकारात्मक पाहायला मिळत होते. अखेर आज भाजपकडून नवनीत राणांना निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे
नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया
"मला उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खूप खूप धन्यवाद. त्यासोबतच अमरावतीतील लोकांनी मला इथंपर्यंत आणलं, त्यांचेही मी आभार मानते. अमरावतीतील जनतेचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता की आमच्या खासदार विकासासाठी जे काही पाऊल उचलतील त्यांच्यासोबत आम्ही राहू. मी मोदीजींचं आणि अमित शाहांचे आभार मानते", असे नवनीत राणा यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला दिलेल्या प्रतिक्रियेवेळी म्हटले.
उमेदवारी जाहीर होताच तातडीने नागपूरला रवाना
यावेळी त्यांना बच्चू कडू यांच्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. पण त्यावर त्यांनी "मी आधीच स्पष्ट केलेय मी ज्या नेत्यांना मानते त्यांचे मी आभार व्यक्त करते", असे म्हणत उत्तर देण्यास टाळाटाळ केली. नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या तातडीने नागपूरला रवाना झाल्या आहेत. नवनीत राणा आजच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे.
दरम्यान नवनीत राणा या 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पण यानंतर गेल्या पाच वर्षात राज्यातील सत्ता समीकरणात मोठा बदल झाला आहे. गेल्या निवडणुकीवेळी भाजपचा कडाडून विरोध करणारे राणा दाम्पत्य येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून लढणार आहेत. त्यामुळे आता अमरावतीत भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे अशी लढत पाहायला मिळणार आहे.