Loksabha Election 2024 Ajit Pawar Group Vs Eknath Shinde Group: लोकसभेच्या निवडणुकीआधीच्या जागावाटपावरुनच महायुतीमध्ये धुसपूस सुरु असतानाच आता अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हा वाद एवढा विकोपाला गेला आहे की अजित पवार गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खासदार पुत्राला यंदाची निवडणूक कठीण जाईल असा सूचक इशाराच दिला आहे. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी अजित पवारांना थेट खुल आव्हान देणारी विधानं केल्याने अजित पवार गट चांगलाच संतापला आहे. शिंदे गटाने आपल्या शिवराळ नेत्यांना आवारावं असं अजित पवार गटाने म्हटलं आहे. थेट शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघाचा उल्लेख करत अजित पवार गटाकडून हा इशारा देण्यात आला आहे.


अजित पवारांवर बेछूट आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर आगपाखड केली होती. बारामती मतदारसंघ कुणाची मक्तेदारी नाही असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर बेछूट आरोप केले होते. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांविरोधात लोकसभेच्या रणांगणात उतरण्याची घोषणा करत विजय शिवतारेंनी पवारांनाच आव्हान दिलं. त्यावरुन आता थेट मुख्यमंत्र्यांच्या मुलाला निवडणुकीत पाडू असा सूचक इशारा अजित पवार गटाने दिला आहे. 


अजित पवार गटाचा थेट इशारा


अजित पवार गटाचे ठाण्यातील नेते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लेकाच्या मतदारसंघावरुन थेट इशारा दिला आहे. शिंदेंनी आपल्या नेत्यांना वेळीच समज द्यावी अन्यथा महायुतीतलं वातावरण बिघडेल आणि कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील, असा इशाराच परांजपे यांनी दिलाय. "माझी माननिय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं. अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला वाटत असेल की कल्याण मतदारसंघ जिंकणं खूप सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता कल्याण मतदारसंघामध्ये वेगळा निकाल लावू शकतो," असं आनंद परांपजेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.


नक्की वाचा >> 'सरकारच्या तिजोरीवर अखेरचा हात मारण्यासाठी ‘खोके सरकार’...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल


श्रीकांत शिंदेंना घ्यावं लागणार अधिक कष्ट


कल्याण मतदारसंघामध्ये आपल्या आक्रमक भूमिकेमुळे श्रीकांत शिंदेंविरोधात कल्याण भाजपामधूनही नाराजीचे सूर अनेकदा उघडपणे समोर आले आहेत. मात्र आता अजित पवार गटानेही श्रीकांत शिंदेंना अडचणीत आणण्याचा इशारा दिल्याने या मतदारसंघात विजयासाठी श्रीकांत शिंदेंना अधिक मेहनत घ्यावी लागेल असं चित्र दिसत आहे. मागील निवडणुकीमध्ये आमदार असलेल्या एकनाथ शिंदेंनी मुलाच्या प्रचारासाठी कल्याण मतदारसंघ पिंजून काढला होता.