Maharashtra Bypoll Dates Announced: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकींची घोषणा केली. याचबरोबर 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकींचीही घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील 26 विधानसबा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका पार पडणार आहे. संबंधित राज्यांच्या लोकसभेच्या मतदानाच्या दिवशीच विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील एका मतदारसंघाचाही समावेश आहे. म्हणजेच या मतदारसंघामध्ये खासदार आणि आमदार निवडण्यासाठी एकाच वेळी मतदान करावं लागणार आहे. 


कोणत्या मतदारसंघात आणि कधी होणार पोटनिवडणूक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. लोकसभेच्या अकोला मतदारसंघाच्या निवडणुकीचं मतदान ज्या दिवशी होणार त्याच दिवशी अकोला पश्चिम मतदारसंघातील मतदार मतदान करतील. म्हणजेच अकोला पश्चिमची विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीच्या दूसऱ्या टप्यात होणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणुक आयोगाच्या अध्यक्षांनी दिली आहे. अकोल्यामध्ये मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. या दिवशी महाराष्ट्रातील बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी या 7 मतदारसंघांमध्येही मतदान पार पडणार आहे. 


कोण होते गोवर्धन शर्मा?


3 नोव्हेंबर 2023 रोजी गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं. ते बऱ्याच काळपासून कॅन्सरशी झुंज देत होते. ते अकोला मतदारसंघातून 6 वेळा आमदार राहिले होते. मनोज जोशींच्या मंत्रीमंडळामध्ये ते राज्य मंत्री होते. ते यवतमाळचे माजी पालकमंत्रीही होते. गोवर्धन शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी नगरसेवक ते आमदार असा राजकीय प्रवास केला. अकोल्यामध्ये भाजपाचा प्रचार आणि प्रसाराच्या कमापासून ते सक्रीय होते. स्वत:कडे मोबाईल नसलेले गोवर्धन शर्मा हे देशातील एकमेव आमदार होते असं म्हटलं जायचं. गोवर्धन शर्मा सायकल आणि दुचाकीवरुन मतदारसंघाचा फेरफटका मारयाचे. प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन ते त्यांच्या समस्या ऐकून घ्यायचे. 


महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदासंघांमध्ये खालील पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे


पहिला टप्पा 


रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर
मतदान तारीख – 19 एप्रिल 


दुसरा टप्पा


बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी
मतदान तारीख – 26 एप्रिल 


तिसरा टप्पा


रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले
मतदान तारीख – 7 मे 


चौथा टप्पा


नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
मतदान तारीख – 13 मे 


पाचवा टप्पा


धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, (मुंबईतल्या 6 जागा)
मतदान तारीख – 20 मे


मतमोजणी तारीख – 4 जून रोजी देशभरामध्ये मतमोजणी होणार आहे.