Dhule Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकांचा शेवटचा आणि महत्त्वाच्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान पार पडत आहे. तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात आणि मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण आता भाजप उमेदवाराकडून मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, ठाणे, कल्याण, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यातील धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भाजपच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर केल्याचे धक्कादायक दृश्य झी 24 च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 


मतदान केंद्रावर सर्रास मोबाईलचा वापर


या व्हिडीओत भाजपचे पदाधिकारी हिरामण गवळी हे मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोनवर बोलताना दिसत आहेत. यात एकीकडे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे मतदान करत असताना दुसरीकडे हिरामण गवळी मात्र मोबाईलचा वापर करत असल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे निवडणूक आयोगाने सर्वांना मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यात बंदी घातली आहे. तर दुसरीकडे भाजप कार्यकर्ते हिरामण गवळी मतदान केंद्रावर सर्रास मोबाईलवर बोलताना पाहायला मिळाले. 


कारवाई होणार का?


आता याप्रकरणी हिरामण गवळी यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. गवळी यांना एक नियम आणि अन्य लोकांना दुसरा नियम आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. एकीकडे भाजपचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येत मतदार बाहेर पडावे, यासाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे भाजप पदाधिकारी हिरामण गवळी यांचं हे वागणं योग्य आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. आता हिरामण गवळी यांच्यावर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  


सरासरी 15.93 टक्के मतदानाची नोंद


दरम्यान राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानात सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत सरासरी 15.93 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. यात धुळे- 17.38 टक्के,  दिंडोरी- 19.50 टक्के, नाशिक - 16.30 टक्के, पालघर-   18.60 टक्के, भिवंडी-  14.89 टक्के, कल्याण  -  11.46  टक्के, ठाणे -   14.86 टक्के,  मुंबई उत्तर - 14.71 टक्के, मुंबई उत्तर - पश्चिम -   17.53 टक्के, मुंबई उत्तर - पूर्व -   17.01 टक्के,
मुंबई उत्तर - मध्य - 15.73 टक्के, मुंबई दक्षिण - मध्य- 16.69 टक्के, मुंबई दक्षिण - 12.75 टक्के मतदान झाले आहे.