Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Thane Candidate Announced: महायुतीच्या जागावाटपामधील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती शिंदे गटाने पत्रक जारी करुन दिली आहे.


ठाण्यावरुन चुरस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघावर भाजपाचा डोळा होता. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी हा मतदारसंघ आपणच लढावा यासाठी कसोशीने प्रयत्न केले. अगदी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाणे मतदरासंघासाठी जोर लावला होता. मात्र मुख्यमंत्री शिंदे हा मतदारसंघ स्वत:कडे कायम राखण्यात यशस्वी ठरले आहेत. पक्षात उभी फूट पडल्यापासून ठामपणे शिंदेंच्या पाठिशी उभे राहणारे एकनिष्ठ कार्यकर्ते तसेच माजी महापौर नरेश म्हस्केंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. म्हस्केंचा थेट सामना महाविकास आघाडीचे उमेदवार आणि उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारेंशी होईल.


कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला संधी


दुसरीकडे कल्याण मतदारसंघही भाजपाने शिंदेंकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्थानिक नेत्यांबरोबरच अगदी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी केलेला हा प्रयत्न शिंदे गटाने यशस्वीपणे परतवून लावला आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंसमोर वैशाली दरेकरांचं आव्हान असणार आहे. वैशाली दरेकर यांना ठाकरे गटाने तिकीट दिलं आहे.


ठाणे आणि शिवसेना जुनं कनेक्शन


शिवसेना आणि ठाण्याचं स्पेशल कनेक्शन आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवसेनेच्या हातात पहिल्यांदा सत्ता देणारं शहर म्हणजे ठाणे! 'शिवसेनेचं ठाणे, ठाण्याची शिवसेना' हे गणित अगदी शिवसेनेत उभी फूटपडेपर्यंत कायम होतं. अर्थात एकनाथ शिंदेंसहीत 40 आमदारांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे राज्याप्रमाणे शिवसेनेचा पारंपारिक मतदार असलेल्या ठाण्यातही 2 गट पडले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठीही ठाकरे गटाकडून राजन विचारेंना सलग तिसऱ्यांदा खासदारकीचं तिकीट देण्यात आलं आहे. शिंदे गटाकडे उमेदवारच नसल्याने ठाणे मतदारसंघ आपणच लढला पाहिजे असं ठाण्यातील स्थानिक भाजपा नेत्यांचं म्हणणं होतं. त्यांनी अगदी पोटतिडकीने आपली ही भूमिका राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडे मांडली होती. विशेष म्हणजे ही भूमिका वरिष्ठांना पटलीही होती. शिंदेंसाठी अगदी मुख्यमंत्रीपद सोडणाऱ्या भाजपाने ठाणे मतदारसंघ सोडण्यास मात्र आढेवेढे घेतल्याचं पाहायला मिळालं.



आता महायुतीकडून केवळ पालघर आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची नावं जाहीर होणं बाकी आहे.