Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला वळण देणारी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून, अवघ्या काही तासांतच या निवडणुकीअंतर्गत पहिल्या टप्प्य़ातील मतदान पार पडणार आहे. सध्या सर्वत्र या टप्प्याच्या अनुषंगानं अखेरच्या क्षणी प्रचारसभा सुरु असून, बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व पक्षांचा प्रचार थांबणार आहे. ज्यानंतर शुक्रवार, 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल. महाराष्ट्रात या टप्प्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 एप्रिलला होणाऱ्या या मतदानामध्ये पाच जागांसाठी लढत पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये काही तुल्यबळ लढती होणार असून, मतदारांचा कल कोणाकडे असेल हीसुद्धा परीक्षा नेत्यांना द्यावी लागणार आहे. 


रामटेक


अनुसुचित जातींसाठीचा राखीव मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या रामटेकमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि वंचितचे पाठिंबा असलेले अपक्ष यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. इथं वंचितनं माघार घेतली असून, अपक्ष उमेदवार किशोर गजभिये  यांना पाठिंबा दिला आहे. तर, श्याम बर्वे विरुद्ध राजु पारवे विरुद्ध किशोर गजभिये असा सामना इथं रंगणार आहे. तेव्हा रामटेकमध्ये गजभिये यांच्या उमेदवारीने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? ओबीसी आणि दलित मतदार मतदारांची भूमिका निर्णयाक ठरणार ? या प्रश्नांची उत्तरं मतदार आपल्या भूमिकांतून आणि मतांच्या रुपातून मांडणार आहेत. 


नागपूर 


नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल. या मतदारसंघात वंचितने उमेदवार न देता काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. तर, इथं बसपाचा उमेदवारही रिंगणात असून आता हत्तीची चाल कोणाला महागात पडाणार? नागपूरच्या विकासाचा गडकरींचा मुद्दा कितपत चालणार? काँग्रेसचे सर्व गटतट शेवटपर्य़ंत एकत्र राहणार का? या प्रश्नांची उत्तरं काही दिवसांतच मिळणार आहेत. 


भंडारा – गोंदिया


भाजपकडून सुनिल मेंढे या विद्यमान खासदारांना भंडारा – गोंदिया मतदारसंघात पुन्हा संधी देण्यात आली असून, काँग्रेसकडून यावेळी डॉ. प्रशांत पडोळे रिंगणात आहेत. इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तब्बल 25 वर्षानंतर मतदारसंघात हाताचे चिन्ह पाहायला मिळत असून, इथं बसपाकडून संजय कुंभलकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेतीच्या पाण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, तांदळाचं पिक मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या मतदारसंघात तांदळाचा मोठा उद्योग उभा राहिला नसल्यामुळं मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. 


हेसुद्धा वाचा : Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊद- छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; फोन आला आणि.... 


गडचिरोली


अनुसुचित जमातींसाठीचा राखीव मतदारसंघ अशी ओळख असणारा आणि घनदाट जंगल, दुर्गम भाग असलेला मतदारसंघ म्हणजे गडचिरोली. विकासापासून कैक मैल दूर असणारा हा नक्षलग्रस्त भाग, आता भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते राखतात की, काँग्रेसकडून नामदेव किरसान बाजी मारतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. 


चंद्रपूर


वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर मतदारसंघात भाजपकडून रिंगणात असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. कुणबी विरुद्ध इतर ओबीसी असा सामना या मतदारसंघात रंगण्याची शक्यता असून, खनिज, उर्जा प्रकल्प, कोळसा खाणींमुळे चंद्रपूरमध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर उभा राहिला आहे. तेव्हा या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कोणत्या उमेदवाराकडे मतदारांचा कल असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.