Loksabha Election 2024 : रायगड- अलिबाग- पेण मार्गावर वाहतूक कोंडी; बड्या नेत्याच्या सभेमुळं सर्वसामान्यांचा खोळंबा
Loksabha Election 2024 : निवडणुकीआधी नेते निघाले प्रचारदौऱ्यांवर अडचणींचा भार मात्र वाढतोय सामान्य नागरिकांच्या खांद्यांवर...
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीदरम्यान सध्या राज्यात अनेक मोठ्या नेत्यांनी प्रचाराच्या अनुषंगानं दौरे सुरु केले आहेत. पण, ज्या मतदारांकडून या नेत्यांना मतं मिळणार आहेत त्याच मतदाररुपी सर्वसामान्य नागरिकांना या नेत्यांमुळं काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलिबागमध्ये सध्या अशीच परिस्थिती उदभवली असून, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यामुळं रायगड- अलिबाग- पेण मार्गानं प्रवास करणाऱ्यांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
बुधवारी भर उन्हाच्या वेळी रायगड - अलिबाग पेण मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. अलिबाग जवळ वेशवी इथं वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आणि ही वाहतूक कोंडी 5 किलोमीटर पर्यंत वाढत गेली. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या अलिबागमधील सभेसाठी आलेल्या वाहनांची या मार्गावर गर्दी झाल्यामुळं नियमित प्रवासी वाहनांनाही कोंडीचा सामना करावा लागला.
वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका आणि अनेक खासगी वाहनांचा समावेश असल्यामुळं यावेळी या मार्गावरून दर दिवशी प्रवास करणाऱ्या अनेकांनाच मनस्तापाला सामोरं जावं लागलं. कालांतरानं वाहतूक कोंडी काही अंशी मोकळी झाली असली तरीही ती पूर्ववत झालेली नाही हे खरं.
हेसुद्धा वाचा : LokSabha: रात्री नेमकं काय घडलं? सामंत बंधूंनी रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून माघार का घेतली? स्वत: केला खुलासा
दरम्यान, 18 एप्रिलला रायगडमधून विद्यमान खासदार सुनील तटकरे अर्ज दाखल करत असून, यावेळी त्यांच्या गटानं जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. अलिबागमधील तटकरे यांच्या सभेसाठीसुद्धा अनेक समर्थक निघाले असून, नेतेमंडळींचीही तिथं गर्दी असणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे आणि सार्वजनिक मंत्री रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.