Solapur Loksabha Constituency : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. आज (शुक्रवारी) 26 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यातील प्रचारसभांकडे जनतेचे लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे येत्या 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहे. सोलापुरात या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते या दोन आमदारांमध्ये थेट लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. तर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही सभा होणार आहे. या दोन्हीही सभा एकाच दिवशी सोमवारी 29 एप्रिलला होणार आहेत. 


सभेची तयारी सुरु


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ही सोमवारी सकाळी होम मैदानावर होणार आहे. सध्या या सभेचा मंच उभारण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच या सभेच्या पार्श्वभूमीवर इतरही तयारी सुरु करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांची सभा ही 30 एप्रिल रोजी होणार होती. मात्र यात बदल करण्यात आला आहे. ही सभा 29 एप्रिलला संध्याकाळी कर्णिक मैदानावर होणार आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे सोलापुरात जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे एकाच दिवशी होणाऱ्या या हायव्होल्टेज सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी लढाई


दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकासआघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्या विरुद्ध महायुतीकडून भाजपचे आमदार राम सातपुते यांना तिकीट देण्यात आले आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपने काँग्रेसचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा प्रणिती शिंदे बाजी मारणार की भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.