Baramti Loksabha : बारामती लोकसभा निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याचे म्हटलं जात आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब मैदानात उतरलं आहे तर दुसरीकडे अजित पवार यांना एकटं पाडलं जात असल्याची टीका राष्ट्रवादीकडून केली जात आहे. याविरुद्ध सुनेत्रा पवार देखील मतदारसंघात जाऊन प्रचार करताना दिसत आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांनी श्रीकृष्णाला कुटुंबातील लोकांनी घेरल्याचं म्हणत विरोधककांवर टीका केली होती. सुनेत्रा पवार यांच्या टीकेला आता आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज जे शरद पवारांना, पुरोगामी विचारांना सोडून गेले त्यात अजित पवार देखील आहेत. ते असत्याच्या बाजूने आहेत, प्रतिगामी विचारांच्या बाजूने आहेत, त्यामुळे विचार त्यांनी बदलला आहे, असं प्रत्युत्तर आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना दिलं आहे. श्रीकृष्णाला कुटुंबातील लोकांनी घेरलं पण विजय श्रीकृष्णाचाच झाला असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या बाबतीत केलं होतं. त्यावर बोलताना रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली.


काकींना चुकीची माहिती दिली - रोहित पवार


"कदाचित काकींना इतिहास माहिती नसावा. ही त्यांची चूक आहे मी असं म्हणणार नाही. पण त्यांच्या अवतीभवती जे सल्लागार आहेत त्यांची चुकीच्या इतिहासाची माहिती दिली. श्रीकृष्णाच्या कुटुंबाच्या बाबतीतला विषय नव्हताच. तो इतिहास श्रीकृष्णाच्या कुटुंबाचा नव्हता तर कौरव पांडव यांचा होता. श्रीकृष्ण हे पूर्वीपासूनच सत्याच्या बाजूने उभे होते. सत्य हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. लोक त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. शेवटपर्यंत श्रीकृष्ण सत्याच्या बाजूने होते आणि विजय सत्याचाच झाला. इथं असत्य विरुद्ध सत्याची लढाई आहे आणि काकींचा दोष नसावा. त्यांना चुकीचा इतिहास सांगितला असावा म्हणून त्या बोलल्या," असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 


सुनेत्रा पवारांनी काय म्हटलं?


"सारोळ्यात सगळेच एकवटले..! अवघ्या काही दिवसात आज पुन्हा सहाव्यांदा भोर वेल्हे मुळशी विधानसभा मतदार संघात सदिच्छा भेटीसाठी दखल झाले. सारोळा येथून या भेटींचा प्रारंभ करताना सर्वप्रथम वंदन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यानंतर झालेल्या सदिच्छा भेटीत महायुतीतील सर्वच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. महायुतीतील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विकासकामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पक्षीय राजकारणा पलिकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला 24 तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. अशा अनेक भावना सर्वांकडून पोटतिडकीने व्यक्त होत होत्या. त्या भावनातून लोकसभा निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला," असे सुप्रिया सुळेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.