`मोदी उद्धव ठाकरेंना घाबरतात, म्हणूनच..`; राऊतांचा दावा! म्हणाले, `ज्यापद्धतीने ते लटपटत..`
Sanjay Raut On PM Modi Vs Uddhav Thackeray: सोमवारी चंद्रपूर येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नकली सेना म्हणत उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला होता. याचसंदर्भातील प्रश्नावरुन राऊतांनी लगावला टोला.
महाविकास आघाडीने आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील खरे नेते उद्धव ठाकरेच असल्याचं म्हटलं आहे. सोमवारी चंद्रपूरमध्ये आयोजित प्रचारसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाला 'नकली सेना' म्हणून उल्लेख करत टीका केल्याच्या मुद्द्यावरुन राऊत यांनी मोदी उद्धव ठाकरेंना घाबरतात असा दावा केला आहे.
मोदींकडून आचारसंहितेचा भंग
"चंद्रपूरमध्ये पंतप्रधान मोदींनी नकली सेना म्हणत टीका केली. बाळासाहेबांच्या विचारांची सेना एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत असंही ते म्हणाले," असं म्हणत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी मोदी आचारसंहितेचं उल्लंघन करत असल्याचा आरोप केला. "आज ते प्रधानमंत्री त्याअर्थाने (आचारसंहिता लागू झाल्याने) नाहीत. तरी ते स्वत:ला प्रधानमंत्री उपाधी लावतात. आचारसंहितेमध्ये कोणीही पंतप्रधान नसतो किंवा मुख्यमंत्री नसतो. निवडणूका जाहीर झाल्या आहेत. ते सरकारी हेलिकॉप्टर आणि यंत्रणा वापरुन प्रचार करत आहेत. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. नरेंद्र मोदी सरकारी विमान, वहानं घेऊन प्रचाराला फिरतात, घोषणा करतात हा अचारसंहितेचा भंग आहे. ज्यांना संविधान किंवा घटना कळत नाही अथवा त्या मानायला तयार नाहीत तेच अशापद्धतीचं काम करु शकतात. मला वाटलेलं त्यांच्याकडे थोडं तरी शहाणपण असेल," असा टोला राऊत यांनी लगावला.
...म्हणून मोदी ठाकरेंना घाबरतात
"जर ते (पंतप्रधान मोदी) बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत असतील तर याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना उद्धव ठाकरेंची आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची किती भीती वाटतेय. ही त्यांच्या मनातली भीती आहे. इतके प्रयत्न करुन, दडपशाही, दमणशाही करुनही, पक्ष फोडूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या वादळामध्ये एका दिपस्तंभासारखे उभे आहेत. भाजपाला, मोदी-शाहांना आव्हान देत अनेक वादळं झेलून ठामपणे उभे आहेत. शरद पवार ठामपणे उभे आहेत. हीच भीती मोदींना आहे," असं संजय राऊत म्हणाले.
मोदी जिथे भाषण करतील तिथे भाजपाची जागा कमी होईल
"बाळासाहेबांच्या शिवसेनेला अशाप्रकारे बोलणं हाच एक नकली विचार आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी अशाप्रकारची भाषणं महाराष्ट्रातून सातत्याने केली पाहिजेत. ते जिथे जातील तिथून भाजपाची जागा कमी झाल्याशिवाय राहणार नाही. असली काय आणि नकली काय हे उद्याच्या निवडणुकीत सिद्ध होईल," असंही राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> राज ठाकरेंची मनसे महायुतीसोबत? प्रश्न ऐकताच राऊतांचं 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'मोदी-शाहांना...'
महाराष्ट्राची लढाई ठाकरे विरुद्ध मोदी
मोदींच्या कालच्या भाषणानंतर असं वाटतंय की नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना आहे की काय? असा प्रश्न पत्रकाराने विचारला. या प्रश्नला उत्तर देताना राऊत यांनी, "नक्कीच आहे. या महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे. धर्म विरुद्ध अधर्म. दडपशाही विरुद्ध प्रामाणिकपणा. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून खंडणीखोरी करणारा भाजपाचा एक नेता विरुद्ध सर्व आमच्याकडून हिसकावून घेऊन सुद्धा या लढ्यात उतरलेला अर्जून आणि कृष्ण अशी लढाई आहे. उद्धव ठाकरेंसमोर नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने लटपटत आहेत त्यातून हे सगळं त्यांच्या तोंडातून बाहेर पडत आहे," असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> नेत्यांकडून जागावाटप पण कार्यकर्ते एकजूट दाखवणार? उद्धव स्पष्टच म्हणाले, 'आपण कशासाठी आणि..'
शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा...; मुख्यमंत्री शिंदेंना टोला
राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला. "जेव्हा शिवसेनेचा जन्म झालेला तेव्हा मोदींबरोबर बसलेला असली नकलीवाला चेहरा आहे तो कुठे होता? गुडघ्याच्या खालीपर्यंतपण नव्हती त्यांची उंची. मोदींच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल भीती आहे. एवढी दपडपशाही केल्यानंतरही उद्धव ठाकरे आजही मैदानात उभे राहून आव्हान देत आहेत. ही भीती चांगली आहे. महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला घाबरलं पाहिजे. असली नकली मोदी नाही ठरवू शकत. हे जनता ठरवेल. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे खरे नेते आहेत. मोदींसमोर त्यांनी आव्हान उभं केल्याने ते घाबरत आहेत. महाराष्ट्राची लढाई ही शरद पवार विरुद्ध मोदी आणि उद्धव ठाकरे विरुद्ध मोदी अशी आहे," असं राऊत म्हणाले.