Loksabha Election 2024 Sharad Pawar Likely To Contest From Satara: सातारा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच साताऱ्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. शरद पवार यांनी कार्यकर्ते आणि पत्रकारांशी संवाद साधताना या मतदारसंघातून कोणला उमेदवारी द्यायची याबद्दल येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय घेऊ असं शरद पवारांनी जाहीर केलं आहे. सातारा मतदारसंघामधील राज्यसभेचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीतून चार ते पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर पुन्हा दाखल आपण निवडणूक लढवणारच असं जाहीर केलं आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून स्वत: शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात अशी शक्यताही नाकारता येत नाही. तसे संकेत पवार यांनीच दिले आहेत. असं झालं तर साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शरद पवार अशी थेट लढाई पाहायला मिळू शकते. 


साताऱ्याने कायमच राष्ट्रवादीला प्रेम दिलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी साताऱ्यातील मतदारांनी कायमच राष्ट्रवादीवर प्रेम केल्याचं नमूद केलं. तसेच श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला असला तरी पक्षासाठी इतर सर्व कामं मी आवडीने करेन असं सांगितलं असल्याचीही माहिती शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिली. "यशवंतराव चव्हाणानंतर साताऱ्याचं कायचम राष्ट्रवादीवर प्रेम राहिलं आहे," असं शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहितीही शरद पवारांनी दिली आहे.


आम्ही समजून घालण्याचा प्रयत्न केला


"श्रीनिवास पाटील यांनी तब्बेतीचं कारण देत निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. आम्ही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकृतीसंदर्भातील कारण त्यांनी दिल्याने नाइलाजानं आम्ही त्यांची भूमिका मान्य केली आहे. असं असलं तरी पक्षासाठी सर्व काम करेन असं श्रीनिवास पाटलांनी सांगितलं आहे," असं शरद पवार म्हणाले. श्रीनिवास पाटील नाही तर कोण असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला असून त्यासंदर्भातही पवारांनी सूचक संकेत दिले आहेत. अगदी आपणही साताऱ्यामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतो असे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.


नक्की वाचा >> 'खैरेंचं काम करणार नाही, मी...'; उमेदवार यादीतून वगळल्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया


पवार स्वत: उभे राहणार?


"साताऱ्यात उमेदवार देताना विशेष काळजी द्यावी लागते. एका गोष्टीचा मला आनंद आहे की सर्व सदस्य आणि सहकाऱ्यांच्या बैठकीत ज्या सूचना केल्या आहेत त्या पक्षाचा विचार करुनच केल्या आहेत," असं शरद पवार म्हणाले. "साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांची मतं मी जाणून घेतली आहेत. उमेदवार कोण असेल यासंदर्भात 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय जाहीर केला जाईल. साताऱ्यातून लढण्यासाठी काहींनी माझं नवंही सुचवलं आहे," असं शरद पवार म्हणाले. काही आठवड्यांपूर्वीही शरद पवारांनी साताऱ्यासहीत अनेक ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची ऑफर असल्याचा उल्लेख केला होता. मात्र यावेळी त्यांनी आपण निवडणूक लढणार नाही असंही म्हटलं होतं. तरीही साताऱ्या सारख्या महत्त्वाच्या जागेवर सक्षम उमेदवार न मिळाल्यास पवार स्वत: या ठिकाणी उभे राहिल्यास आश्चर्य वाटणार नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.


नक्की वाचा >> 'मविआ'बरोबर काय बिनसलं? आंबेडकर स्पष्टच म्हणाले, 'त्यांनी 'तो' फॅक्टर लक्षातच घेतला नाही म्हणून..'


सातारा किंवा माढ्यातून लढण्याची मागणी


शरद पवार यांनी यापूर्वी 22 मार्च रोजी पत्रकार परिषदेत बोलताना समोरच्या बाजूने उमेदवार घोषित झाल्यानंतर इनकमिंगमध्ये वाढ होईल, असा दावा केला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातारा किंवा माढा लोकसभेला शरद पवारांनी स्वतः उतरावं यासाठी कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार यांनी आपण कोठूनही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केलं होतं. पण आता अगदी जवळचा मित्र निवडणुकीत उतरत नसल्याने पवार या निर्णयाचा फेरविचार करु शकतात अशी चर्चा आहे. दरम्यान श्रीनिवास पाटील यांच्या नकारानंतर साताऱ्यामधून शशिकांत शिंदे किंवा बाळासाहेब पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते अशीही चर्चा आहे.