`भटकती आत्मा`च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...
Sharad Pawar PM Modi News : `भटकती आत्मा` नेमकं कोण यासंदर्भात खुद्द शरद पवार यांनीच केला खुलासा. त्यांचं वक्तव्य सारे ऐकतच राहिले. पाहा ते नेमकं काय आणि कोणाला उद्देशून म्हणाले...
Sharad Pawar PM Modi News : लोकसभा निवडणुकीच्या (loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या राज्यात मोठ्या नेत्यांच्या सभा सुरु असून, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा मागे राहिलेले नाहीत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुण्यातील एका जाहीर सभेमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. 'भटकती आत्मा' असा उल्लेख करत नाव न घेता शरद पवार यांच्यासंदर्भात पंतप्रधानांनी अप्रत्यक्षरित्या केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक चर्चांना सुरुवात झाली, टीकाही झाल्या. या साऱ्यावर आता खुद्द शरद पवार पुन्हा एकदा व्यक्त झाले आहेत.
गुरुवारी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेदरम्यान 'भटकती आत्मा'संदर्भातील प्रश्न विचारताच, हा प्रश्न ऐकताक्षणी शरद पवारांनी मिश्किल हास्य केलं आणि त्यांच्या या हास्यातच प्रश्नाचं उत्तर मिळालं. 'हा आत्मा अस्वस्थ आहे हे खरं... असं म्हणत मोदी आता भटकती आत्मा म्हणून गेले... ते एकदा म्हणाले मी कुणाचं बोट धरून राजकारणात आलो, आता अस्वस्थ आत्मा म्हणून गेले, सध्या मोदी काहीही बोलत आहेत', असं शरद पवार म्हणाले. मुळात या सर्व प्रकरणामध्ये पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठछा झाली आहे या वक्तव्यावर त्यांनी जोर दिला. 'स्थानिक नेते लिहून देतात तेवढं मोदी बोलतात', असं म्हणत शरद पवार यांनी मोदींना टोला लगावला. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्स नसल्याचीही ठाम भूमिका मांडली.
हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : 'कामासाठी जाताच पक्षप्रवेश करून घेतला' ठाकरे गटातील नेत्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप
पुण्यातील सभेत काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
पुण्यातील सभेदरम्यान, 'महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका पण, आमच्याकडे म्हणतात काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं, तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे', असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं होतं.
पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, बऱ्याचजणांनी यावर नाराजीचे सूरही आळवले आणि निवडणुकीच्या वातावरणाला एक नवं वळण मिळालं. ज्यावर आता शरद पवार पुन्हा एकदा व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान कोल्हापुरातील पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवारांनी महाराष्ट्रातील मतदानाच्या टप्प्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणूक घेण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी विचारला. राज्यकर्त्यांना चिंता असावी असं दिसतंय म्हणूनच मोदी पुन्हा पुन्हा राज्यात कसे जातील याची काळजी घेतली गेलीय असा घणाघात पवारांनी केला.