Sunil Tatkare Big Claim About Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2023 साली मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये उभी फूट पडली. तत्कालीन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 8 आमदार मंत्रीपदाची शपथ घेऊन राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. शिवसेनेपाठोपाठ राज्यातील दुसरा मोठा स्थानिक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतही फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच सार्वजनिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्येही सत्तासंघर्षाबरोबरच दोन्ही पक्षांमध्ये पडलेली फूट आणि इतर बाबींवरुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.


लोकसभेच्या जागा आणि मंत्रीपदं ही ठरलेली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील तटकरेंनी केलेल्या दाव्यानुसार 2016 मध्ये भाजप सोबत सत्ता स्थापनेचा आदेश शरद पवारांकडून देण्यात आला होता. "राष्ट्रवादी आणि भाजपादरम्यान मंत्रीपदं ही ठरली होती. दोन्ही पक्षांमधील खाते वाटपही झाले होते. अगदी लोकसभेच्या जागाही ठरल्या होत्या. त्या काळात अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक झाली आणि त्या बैठकीला साहेबही (शरद पवारही) उपस्थित होते," अशा खळबळजनक गौप्यस्फोट तटकरेंनी केला आहे. 


...तर राजकारणातून निवृत्ती घेईन


यावेळेस झालेल्या चर्चेमध्ये नेमकं काय ठरलं होतं याबद्दलचा तपशील तटकरेंनी सांगितला. "बिहारच्या धर्तीवर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायचा असं ठरलं होतं. मात्र राष्ट्रवादीला यायचे असेल तर यावे, आम्ही युतीतून शिवसेनेला बाहेर काढणार नाही असा सूर अमित शाहांनी आळवला. त्यावेळी उध्दव ठाकरेंची शिवसेनाला आम्हाला, राष्ट्रवादीला नको असं म्हणत होती. यातलं एकजरी वाक्य खोटं निघालं तर राजकारणातून निवृत्ती घेईन," अशा शब्दांत तटकरेंनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलं आहे. 


नक्की वाचा >> हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!


पवारांच्या आज माढ्यात सभा


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरलेत आहेत. वयाचा विचार न करता शरद पवार एकामागोमाग एक उममेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. 24 एप्रिल रोजी शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघात सभा घेत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज मोडनिंब इथे जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर शरद पवार संत सावता माळी यांच्या समाधीचे अरण इथे जाऊन दर्शन घेणार आहेत.