कोकणात भास्कर जाधव नाराज? `पहिल्या दिवसापासून गद्दारी विरोधात रान पेटवले, आता...`
MLA Bhaskar Jadhav On Narayan Rane: न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्राण्ड आमदार नाराज असल्याचा सूर विरोधकांकडून आळवला जातोय.
MLA Bhaskar Jadhav On Narayan Rane: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात कोकणताली मतदार संघाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत आहे. दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्राण्ड आमदार नाराज असल्याचा सूर विरोधकांकडून आळवला जातोय. ते विनायक राऊतांच्या प्रचारात कुठे दिसत नसल्याचे म्हटले जाते. यावर थेट भास्कर जाधव यांनाच विचारण्यात आले. त्यांनी काय उत्तर दिलंय? जाणून घेऊया.
नाराज आहात का? या प्रश्नावर भास्कर जाधव म्हणतात, तुम्हाला माहिती असेल की 20 जून 2022 रोजी शिंदेंनी पक्ष फोडला. पहिल्या दिवसापासून आम्ही गद्दारी विरोधात रान पेटवले. भास्कर जाधव रान पेटवताना बरोबरीने होता. विधानसभेतसुद्धा भास्कर जाधव जितके प्रहार करतो तितके कोणीही करत नाही.जाहीर सभांमध्ये सुद्धा भास्कर जाधवने विरोधकांवर टीका केली आहे. त्यामुळे आता प्रचारात नाही असं म्हणण्यात काहीही अर्थ नसल्याचे ते म्हणाले.
योद्धा शरण जात नाही तेव्हा बदनाम
ज्यावेळेला योद्धा शरण जात नाही तेव्हा प्रतिस्पर्धी गोटातून, विरोधी गोटातून त्याला बदनाम केलं जातं. ही कूटनीती खेळली जात आहे.या गोष्टीला फार काही अर्थ नाही असे स्पष्टीकरण भास्कर जाधवांनी दिले. तसेच यावेळी त्यांनी भाजप नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर टीका केली. नारायण राणे यांच्या कोणत्याच वक्तव्यावर भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही. हजार वेळा ते हे बोलले आहेत..कोकणात उद्धव साहेब, आदित्य साहेब यांनी अनेकदा सभा घेतली आहे, असे ते म्हणाले.
एकदा ती चौकशी कराच
फडणवीस, दरेकर यांना अटक करण्याचा महाविकास आघाडीचा कट होता, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. यावर बोलताना त्यांच्यावर कोणते ना कोणते गुन्हे असावेत म्हणून अटक होय शकते, हे शिंदेना माहिती असेल असे ते म्हणाले. कोणते गुन्हे केले होते हे त्यांना माहिती असेल आणि ते का लपवत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता अटक करण्याचं धाडस शिंदेनी करावे असे आवाहन त्यांनी केले. कोणालाही अटक झाली की भाजपचे शिरसस्त नेते सांगत असतात. आता कर नाही ते डर कशाला? असा प्रश्न भास्कर जाधवांनी विचारला. एकदा ती चौकशी कराच असे ते म्हणाले.
भाजपला ठाकरेंकडून ऑफर होती का?
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार भाजपला ठाकरेंकडून ऑफर होती का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना मी या चर्चेत कुठेच नव्हतो. उद्धव साहेबांनी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं पहिल्या दिवसापासून मान्य केलं होतं. हे आता शिंदे साहेबांनी मान्य केलं.त्यांनी मान्य केलं यासाठी मी शिंदे साहेबांचे आभार मानतो, असे भास्कर जाधव म्हणाले.