Sujay Vikhe Patil English Challange: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांची यादी जाहीर होऊ लागल्यानंतर प्रचाराला जोरदार सुरुवात झाली. एकमेकांविरोधात उभे राहिलेले उमेदवार एकमेकांची उणीधुणी काढत आहेत. समोरच्या माणसाची पडती बाजू उचलून त्यावरुन टीका करत आहेत. असाच प्रसंग अहमदनगर येथे पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी जेवढी इंग्रजी बोललो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलावं असे आव्हान भाजप उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं आहे. एवढेच नव्हे तर निलेश लंकेंनी इतकी इंग्रजी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असंही त्यांनी सांगितलंय.नगर शहरात राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना निलेश लंके यांना चिमटे काढले. मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. याचा आधार घेत सुजय विखेंनी ते आव्हान दिले आहे. निलेश लंकेंनी महिनाभरात जरी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असं सुजय विखेंनी म्हटले आहे.


अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये महायुतीचे विखे विरुद्ध महाविकास आघाडीचे लंक यांच्यात सामना रंगणार आहे. 


सुजय विखे पाटील यांचा विधानावर निलेश लंके यांचे समर्थक सोशल मीडियात प्रतिक्रिया देत आहेत. निलेश लंकेंना आयत काही मिळालं नाही, त्यांनी संघर्ष केला. कोणत्या इंग्रजी शाळेत शिकले नाहीत, असे म्हणत कार्यकर्ते सुजय विखेंवर टीका करत आहेत.


निलेश लंकेंचा 'कम से कम दो लाख'चा नारा


राजकारणातून सत्ता मिळवायची आणि सत्तेतून संपत्ती कमवायची असे काहीजण असतात पण आम्ही दुसऱ्या पध्दतीत काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही राजकारणातून सत्ता मिळवतो आणि सत्तेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, असे निलेश लंके म्हणाले. निवडणूकीचा निकाल ठरलेला आहे, "कम से कम दो लाख", असं म्हणत निलेश लंके यांनी 2 लाख मतांनी विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.दक्षिण नगर जिल्ह्यातील 75 टक्के भाग दुष्काळी भाग आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, इथली बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निलेश लंके यांनी प्रचारादरम्यान सांगितले. मला संधी दिली तर प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. सुजय विखे पाटील यांनी मतदार संघात साखर-डाळ वाटप कार्यक्रम घेतला होता. यावर निलेश लंकेंनी टीका केली. निवडून आल्यानंतर थेट 5 वर्षांनी काहीजण डाळ-गूळ वाटायला आले, असे म्हणत निलेश लंकेंनी विखेंवर टीका केली होती.