Sushma Andhare Helicopter Crashed: उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना आणण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना महाडमध्ये घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही काहीही इजा झालेली नाही. सुषमा अंधारे आणि हेलिकॉप्टरचा पायलेट दोघेही सुरक्षित आहेत. हे हेलिकॉप्टर नेमकं कशामुळे क्रॅश झालं याची माहिती समोर आलेली नाही. 


नक्की घडलं का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघात झाला तेव्हा सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झालं. गेल्या 2 दिवसांपासून सुषमा अंधारे ठाकरे गटाचे रायगडमधील उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गितेंच्या प्रचारासाठी रायगड दौऱ्यावर आहेत. आज आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरने मुरुडला जाणार होत्या. त्यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाडमधील एका मैदानात उतरत असताना त्याचा अपघात झाला. जमीनीपासून काही फुटांवर असतानाच हेलिकॉप्टरवरील पायलटचं नियंत्रण सुटलं आणि ते खाली पडलं. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. हेलिकॉप्टरचं मोठं नुकसान झालं आहे. धुळीचे लोट उडाल्याने हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं प्राथमिक कारण सांगितलं जात आहे.


व्हिडीओ आला समोर


हेलिकॉप्टरच्या अपघाताचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हेलिकॉप्टर हळूहळू मैदानाच्या दिशेने खाली येताना दिसत आहे. हे हेलिकॉप्टर जसजसं जमीनीच्या जवळ येतं त्याप्रमाणे मैदानावरील मातीमुळे धुळीचे लोट उठू लागतात. याच धुळीच्या लोटांमुळे हेलिकॉप्टर जमीनीपासून काही अंतरावर असताना खाली कोसळते आणि धुळीचे लोट अधिक जास्त प्रमाणात दिसू लागतात.


सामान्यपणे मैदानावर मारतात पाणी


सामान्यपणे हेलिकॉप्टर उतरवलं जातं अशा ठिकाणी खास करुन मैदानांमध्ये आधी पाणी फिरवालं जातं. हेलिकॉप्टर उतरताना त्याच्या पंखांमुळे मोठ्याप्रमाणात माती आणि धूळ उडण्याची शक्यात असते. मात्र महाडमध्ये ही दुर्घटना घडली त्यावेळी पाणी फावरण्यात आलं नव्हतं असं सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे. 


नेमक्या कारणाचा शोध घेणार


धुळीच्या लोटांमुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं प्राथमिक कारण समोर येत असलं तरी नेमका हा अपघात कशामुळे झाला याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचं समजतं. कमी उंचीवरुन हे हेलिकॉप्टर अगदी जमिनी लगत असताना पडल्याने विमानातील पायलेटबरोबरच कोणालाही कोणतीही इजा झाली नाही. मात्र अशाप्रकारे अपघात घडण्यासाठी स्थानिक प्रशासन जबाबदार आहे की इतर काही कारणं आहेत याचा शोध घेतला जाणार आहे. सुषमा अंधारे यांचा आजचा नियोजित दौरा कायम राहील अशी प्रथमिक माहिती समोर येत आहे.